
देशभरात यंदा आले (अद्रक) उत्पादनात मोठी वाढ झाली आहे आणि त्याचा थेट परिणाम बाजारभावांवर दिसत आहे. १ ते २८ एप्रिल २०२५ दरम्यान देशात एकूण ४०,०६८.२५ टन आले बाजारात दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी म्हणजे २०२४ च्या याच कालावधीत ही आवक २४,२९५.३० टन इतकी होती. यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ६५ टक्क्यांनी आलेची आवक वाढली आहे.
सध्या महाराष्ट्रात, विशेषतः नाशिक आणि सातारा बाजारात, आल्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. नाशिकमध्ये सध्या आलेचे भाव २५०० ते २७०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत, तर सातारा बाजारात १३०० ते १७०० रुपये प्रति क्विंटल इतके कमी दर आहेत. मागील वर्षी एप्रिलमध्ये नाशिकमध्ये आलेचे दर ७ हजार ते ९ हजार रुपये क्विंटल होते, तर महाराष्ट्रातील इतर भागांत ते १० हजार रुपये क्विंटलपर्यंत गेले होते. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठ्या दरघटीचा फटका बसला आहे.
यंदा आलेची सर्वाधिक आवक उत्तर प्रदेशात झाली असून १३,२७३.१५ टन आले बाजारात आले आहे. त्यानंतर महाराष्ट्र (५,२०७.७० टन), गुजरात (५,४६४.५८ टन), दिल्ली (५,५१३.५० टन) आणि केरळ (३,०५८.६१ टन) या राज्यांचा क्रमांक लागतो. मागील वर्षीच्या तुलनेत उत्तर प्रदेशात जवळपास ५ हजार टनांची वाढ झाली आहे, तर महाराष्ट्रातही सुमारे २ हजार टनांची वाढ नोंदली गेली आहे. गुजरात आणि दिल्ली या बाजारांतही आवक लक्षणीय वाढली आहे.
अलीकडील ताज्या माहितीवरून असे दिसते की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आलेची लागवड देशभरात वाढली आहे. कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांनी अधिक क्षेत्रावर आलेची लागवड केली आहे. त्याचबरोबर मागील काही वर्षांत आले साठवणूक आणि प्रक्रिया उद्योगांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी उत्पादन वाढवू लागले आहेत.
राज्यात आल्याची आवक वाढली; भाव घसरले..
दरम्यान २१ एप्रिल ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत महाराष्ट्रात एकूण १२,९३४ क्विंटल आल्याची आवक झाली. यामध्ये सर्वाधिक आल्याची आवक मुंबई (लोकल) बाजारात झाली असून, एकट्या मुंबईत २,७७८ क्विंटल आवक झाली आहे. त्यानंतर पुणे लोकल बाजारात २,३१९ क्विंटल, नागपूर लोकलमध्ये २,४८५ क्विंटल आणि नाशिक हायब्रीड बाजारात १०३ क्विंटल आल्याची नोंद झाली. या आठवड्यातील आकडेवारीतून स्पष्ट होते की, राज्यात सर्वाधिक आवक मुंबईत झाली आहे.
नाशिकमध्ये या कालावधीत आल्याची आवक तुलनेने कमी राहिली असून सरासरी बाजारभाव २५०० ते ६००० रुपये क्विंटलच्या दरम्यान आहे. नांदेड (छत्रपती संभाजीनगर) येथे आल्याची सरासरी आवकही मर्यादित असून दर साधारणतः १९०० ते २७०० रुपये क्विंटल दरम्यान राहिले आहेत. सातारा जिल्ह्यात आल्याची आवक सातत्याने होत असून येथे सरासरी दर १५०० ते ३००० रुपये क्विंटल आहेत. सांगलीमध्ये आल्याची थोडीफार आवक झाली असून सरासरी भाव २००० ते २५०० रुपये क्विंटल आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही आल्याची मर्यादित आवक असून सरासरी दर २२०० ते २६०० रुपये क्विंटल आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातही दर चढ-उतारासह १९५० ते २७०० रुपये क्विंटल आहेत. पुणे आणि पुणे लोकल बाजारात मोठ्या प्रमाणावर आल्याची आवक झाली असून येथे सरासरी दर २१०० ते ३००० रुपये क्विंटल दरम्यान आहेत.
राज्यात एकंदर पाहता, या आठवड्यात आल्याचे सरासरी बाजारभाव २२५० ते २९०० रुपये क्विंटल दरम्यान आहेत. मागील वर्षी याच कालावधीत दर तुलनेने जास्त होते. यंदा आल्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने आणि साठवणूक क्षमता मर्यादित असल्याने बाजारभावात घट झाली आहे.
ताज्या माहितीनुसार, यंदा देशभरात तसेच राज्यातही आल्याचे लागवड क्षेत्र वाढले आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि केरळ या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये लागवडीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुढील काही काळ आल्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता कमी आहे. बाजार समित्यांच्या निरीक्षणानुसार, आवक अधिक असल्याने पुढील आठवड्यांतही आल्याचे दर सध्याच्या पातळीवरच राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.