
maharashra weather : मुंबई आणि कोकण भाग वगळता महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरण जाणवत आहे आणि हे चित्र शनिवार, ३ मे २०२५ पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र पावसाच्या फारशा शक्यता नाहीत, असे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी आपल्या अंदाजात सांगितले आहे.
सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दुपारी कमाल तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान तर विदर्भ व मराठवाड्यात ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. हे तापमान सध्या सरासरीच्या आसपास असून, पुढील आठवड्यात त्यात १ ते २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, उष्णतेची लाट किंवा रात्रीच्या उकाड्याची स्थिती महाराष्ट्रात पुढील आठवड्यात जाणवणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र मराठवाड्यात वाऱ्याचा वेग तुलनेत मंद असल्याने औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान जाणवू शकते.
भारतीय हवामान विभागाच्या ताज्या निरीक्षणानुसार, अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय होण्याची शक्यता असून त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही. तसेच हवेत दमटपणा वाढण्याची शक्यता असल्याने काही भागात रात्री उष्णता जाणवू शकते.
सध्या महाराष्ट्रात कोणत्याही टोकाच्या वातावरणीय बदलाची किंवा मोठ्या हवामानीय आपत्तीची शक्यता नाही, असे माणिकराव खुळे यांनी नमूद केले आहे.