Organic turmeric : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती प्रकल्पाने विकसित केलेल्या ‘बायोमिक्स’ जैविक खतामुळे हळद पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून, शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो आहे. हे बायोमिक्स मातीचा पोत सुधारते, हळदीच्या कंदांची गुणवत्ता वाढवते, तसेच रोगप्रतिकारशक्ती बळकट करते. यामुळे उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ दिसून आली आहे. याशिवाय, हळदीचा रंग, सुवास आणि साठवण क्षमताही वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या जैविक खताचा वापर करून हळदीत विक्रमी उत्पादन घेतलेल्या लोहा (जि. नांदेड) येथील प्रगतशील शेतकरी रत्नाकर ढगे यांनी “बायोमिक्स हे अमृता सारखं आहे!” असे उद्गार काढले. २२ एप्रिल रोजी त्यांनी कृषीप्रधान शेतकरी सेंद्रिय उत्पादक कंपनीच्या शिष्टमंडळासह विद्यापीठातील बायोमिक्स संशोधन केंद्राला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी बायोमिक्सच्या उपयोगाने मिळालेल्या यशाचा अनुभव शेअर केला.
बायोमिक्सच्या परिणामकारकतेवर विश्वास ठेवून यावर्षी कृषीप्रधान कंपनीने ३ टन बायोमिक्सची आगाऊ खरेदी केली आहे. या प्रसंगी शेतकरी गणपत जामगे, ओम भालके, ज्ञानोबा येवले, मनोज जाधव यांचाही सहभाग होता.
या कार्यक्रमात सेंद्रिय शेती प्रकल्पाचे प्रभारी डॉ. आनंद गोरे व सहकारी डॉ. पपीता गौरखेडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. बायोमिक्स संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी बायोमिक्सच्या संशोधन, उत्पादन व वापर पद्धतींची सविस्तर माहिती दिली. त्यांनी हे खत शाश्वत शेतीकडे नेणारे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले.
बायोमिक्सचा हा यशस्वी प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श ठरतो आहे. सेंद्रिय शेतीला चालना देत, उत्पन्नवाढीची नवी दिशा दाखवणारा हा प्रयोग भविष्यातील शेतीसाठी आशेचा किरण ठरत आहे.












