Unhali Kanda Bhazarbhav : उन्हाळी कांद्याचा आठवडाभर कसा राहिला ट्रेंड; भाव वाढले की कमी झाले, घ्या जाणून…

Unhali Kanda Bhazarbhav

Unhali Kanda Bhazarbhav : आज सोमवार दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याचे सरासरी प्रति क्विंटल दर १२०० रुपये असे आहेत. शनिवारच्या तुलनेत त्यात ४० रुपये प्रति क्विंटल घट झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात सोमवारी बाजार सुरू झाले तेव्हा लासलगावला कांद्याचे बाजारभाव सरासरी १२८० रुपये होते. त्यानंतर संपूर्ण आठवडा या दरात साधारत: १० ते २० रुपये प्रति क्विंटल घट होऊन शनिवारी ते १२४० रुपये राहिले.

दरम्यान दिनांक २१ एप्रिल ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत महाराष्ट्रात एकूण १० लाख २४ हजार ५७५ क्विंटल कांद्याची आवक झाली. यामध्ये उन्हाळी कांदा सर्वाधिक म्हणजे ५ लाख ३७ हजार ३५७ क्विंटल होता. लाल कांद्याची आवक २ लाख ३४ हजार ३२९ क्विंटल, लोकल कांदा १ लाख ३३ हजार ४६३ क्विंटल आणि पांढऱ्या कांद्याची आवक १९ हजार ४२६ क्विंटल इतकी नोंदली गेली.

नाशिक बाजारात या आठवड्यात उन्हाळी कांद्याचे सरासरी दर ९९० ते १११० रुपये क्विंटलच्या आसपास राहिले. सोलापूरमध्ये दर ७५० ते ९०० रुपये, पुण्यात ९५० ते १०८० रुपये, अहिल्यानगरमध्ये ८८० ते १०५० रुपये तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ७०० ते ९५० रुपये क्विंटल दरम्यान राहिले. यावरून स्पष्ट होते की, आठवड्याच्या सुरुवातीस थोडी वाढ दिसली असली तरी आठवड्याच्या शेवटी दरात सौम्य घट झाली आहे. सध्या उन्हाळी कांद्याची मोठी आवक सुरू असल्याने दर काहीसे दबावाखाली आहेत. पुढील काही आठवडे ही स्थिती कायम राहण्याची शक्यता बाजार समित्यांकडून वर्तवली जात आहे.

राज्याचा विचार करता या आठवड्यात राज्यात उन्हाळी कांद्याला सरासरी ९८० ते १०१० रुपये क्विंटल दर मिळाला. तर लाल कांद्याला सरासरी ७५० ते ८०० रुपये क्विंटल दर मिळाल्याचे नोंदले गेले. लोकल कांद्याचे सरासरी दर ९५० ते १०५० रुपये क्विंटल होते तर पांढऱ्या कांद्याला १००० ते १०५० रुपये दर मिळाले. यावरून स्पष्ट होते की, उन्हाळी व लोकल कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याचे दर कमी राहिले आहेत.

राज्यात उन्हाळी कांद्याला सर्वाधिक सरासरी दर नाशिक जिल्ह्यात मिळाला आहे. येथे उन्हाळी कांद्याला किमान ४६० रुपये आणि कमाल १४०३ रुपये क्विंटल दर मिळाला आहे. दरम्यान या आठवड्यात राज्यात दररोज सरासरी १ लाख ४६ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे दररोज सुमारे ३० हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होत असल्याचे दिसते. पुणे, सोलापूर, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या बाजारातही नियमितपणे मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली आहे.