यंदाचा गाळप हंगाम कधी सुरु होणार, काय आहे ऊस गाळप हंगामाबाबत मोठी अपडेट जाणून घ्या सविस्तर ..

साखर हंगाम दिवाळीमुळे आधीच १५ दिवस लांबलेला आहे . आता निवडणूक आयोगाच्या परवानगीच्या कात्रीत अडकला आहे. पूर्वी जाहीर केल्यानुसार साखर हंगामाला १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार होती . परंतु , २० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानामुळे हंगाम २५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची परवानगी मिळावी, असे पत्र राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहे.

 साखर, तसेच इथेनॉलच्या उत्पादनात या लांबलेल्या हंगामामुळे घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शेजारील गुजरात व कर्नाटकात हंगाम सुरू झाल्याने ऊसतोड मजुरांची कमतरता जाणवणार आहे .

मागच्यावर्षी साखर हंगाम दिवाळीनंतरच १ नोव्हेंबर रोजी सुरू केला होता . त्यामुळे यावर्षी देखील दिवाळीनंतरच हंगाम सुरू करावा, अशी मागणी साखर उद्योगातून केली होती . त्यानुसार ऊस गाळपाला १५ नोव्हेंबर रोजी सुरुवात होईल, असे जाहीर करण्यात आले आहे.

कारखान्यांना त्यानुसारच गाळप परवाना वाटप केला जाईल असे ठरले होते. परंतु , २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदान होणार आहे.ऊस तोडण्यासाठी मजूर प्रामुख्याने मराठवाड्यातून अन्य विभागात येत असल्याने १५ नोव्हेंबर रोजी हंगाम सुरू झाल्यास या मजुरांना मतदान करता येणार नाही, या भीतीपोटी साखर हंगाम १५ नोव्हेंबर रोजी सुरू होणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

हंगाम या तारखेला सुरू करायचा असल्यास त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल ; परंतु हंगाम मतदानानंतरच सुरू करावा, अशी मागणी राज्य सरकारकडे काही संघटनांनी केली होती.

त्यानुसार २५ नोव्हेंबरनंतरच राज्य सरकारने यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू करावा, अशी परवानगी आयोगाकडे मागितली आहे. यासंदर्भात अजूनही आयोगाकडून ही कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही .

दुसरीकडे, साखर, तसेच इथेनॉलच्या उत्पादनातही हंगाम लांबल्यास घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे उशिरा हंगाम सुरू झाल्यास राज्यातील ऊसतोड कामगार शेजारील कर्नाटक व गुजरात राज्यात जाण्याची भीती आहे. त्यामुळे राज्यात ऊसतोडणीसाठी कामगार मिळणे कठीण होऊ शकते.

त्यामुळेच हंगाम १५ नोव्हेंबर रोजीच सुरू करावा, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे; परंतु मतदानानंतरच हंगाम सुरू करण्यात येईल , अशी शक्यता आता सूत्रांनी व्यक्त केली आहे. १५ नोव्हेंबर रोजी यंदाचा हंगाम सुरू केल्यास त्यासाठी साखर कारखान्यांना गाळप परवाने द्यावे लागणार आहेत.

परंतु , हंगाम लांबेल अशा शक्यतेने अद्याप एकही परवाना देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता राज्यातील ऊस गाळप हंगाम विधानसभा निवडणुकीच्या धामधमुमीनंतरच सुरू होणार आहे.

जर हंगाम वेळेत सुरू झाला, सुरू करण्याची परवानगी मिळाली तर परवाने तयार आहेत. कारखान्यांनी आयुक्तालयाकडे गाळपासाठी आवश्यक असणारी रक्कम बहुतांश जमा केली आहे. अशा कारखान्यांचे परवाने तयार केलेले आहे . हंगाम सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून आदेश आल्यानंतर हे परवाने लवकरात लवकर वितरित करण्यात येतील – कुणाल खेमनार, आयुक्त, साखर

Leave a Reply