
Meters for agricultural pumps : महाराष्ट्रात पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी नवीन पद्धतींचा वापर आणि नवनवीन धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे व त्यादृष्टीने पावले टाकण्यात येत असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषद सदस्य शशिकांत शिंदे, विक्रम काळे यांनी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला जलमापक यंत्रे बसविण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना अधिक पाणी देण्यासाठी आणि जुनी व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. पाणी वाटपाच्या आकारणीसाठी मीटर पद्धती किंवा वॉल्यूमेट्रिक पद्धत अधिक उपयुक्त आहे, यावर विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
काही भागांमध्ये भौगोलिक स्थितीमुळे पुरानंतर पाण्याचा अपव्यय होतो, तर काही भागांमध्ये पाणी संघर्ष आहे. त्यामुळे उद्भवलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे श्री.विखे पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर जुने ढाचे सुधारण्याचे प्रयत्न सुरू असून यामुळे पाण्याचे अधिक योग्य व्यवस्थापन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जलसंपत्ती प्रशासनात सुधारणा करण्यासाठी नव्या उपाययोजना आणि निर्णय घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.