
Walmik Karad : मस्साजोग, जि. बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण खूनाप्रकरणी मागील २० दिवसांपासून फरार असलेला मुख्य संशयित सूत्रधार वाल्मिक कराड अखेर काल पुणे सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आला. त्यापूर्वी त्याने स्वत:च्या बचावासाठी एक व्हिडिओ केल्याने आता याप्रकरणी पुन्हा राजकारण रंगले असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे आणि एकूणच महायुतीसमोरच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. योग्य पुरावे असतील, तर कुणालाही सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्याच वेळेस काल मंगळवारी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केल्याचे समजते. आपले मंत्रीपद वाचवावे अशा अर्थाची ती चर्चा होती, असे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे. दरम्यान आश्चर्यकारक रित्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी मौन बाळगल्याचे दिसत आहे.
शरण आलेल्या वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अगदी जवळचा समजला जातो. मध्यंतरी एका कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले भाऊ धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराडशिवाय पानही हलत नाही असे जाहीर सांगितले होते. त्याचा व्हिडिओही नंतर माध्यमांमध्ये खूप चर्चेचा विषय ठरला. सरपंच संतोष देशमुख् यांच्या हत्येनंतर विधानसभेत भाजपा आमदार सुरेश धस यांनी हा प्रश्न मांडला होता. त्यानंतर अनेकांनी हा प्रश्न मांडून या प्रकरणी संशयितांना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली होती.
दुसरीकडे आमदार धस यांचेही वाल्मिक कराडसोबत संबंध असून अनेक सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांसोबत त्याचे फोटो असून त्यांच्याशीही त्याचे संबंध असल्याचा आरोप होत आहे. मागच्याच आठवड्यात सकल मराठा समाजासह सर्वपक्षीय मोर्चा या विरोधात बीडमध्ये निघाला आणि राजकारण पुन्हा तापले. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना अपराध्यांना शिक्षा करण्याची मागणी करण्यासोबतच सरकारने योग्य पाऊल उचलले नाही, तर संपूर्ण राज्यात मोर्चे काढण्याचा इशारा दिला होता. त्यातून महायुती सरकारवर दबाव वाढला होता.
दरम्यान वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर चौकशी दरम्यान किंवा केसच्या पुढील सुनावणीत कोर्टात त्याच्याकडून केवळ मंत्री मुंडेच नव्हे, तर भाजपाच्या अनेक नेत्यांचा ‘कच्चा चिठ्ठा’ वाचला जाण्याची भीती राजकीय नेत्यांना सतावत आहे. दुसरीकडे त्याच्याबद्दल रोषही वाढत असून त्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होऊ शकतो, अशी दबक्या आवाजातील चर्चा सध्या परळीसह बीड जिल्ह्यात रंगली आहे.