Onion Prices Fall: लासूर स्टेशन येथील कांदा मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढली असताना परराज्यातील मागणी घटल्याने गेल्या २२ दिवसांत कांद्याचे दर ५२५ रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले असून कांद्याला हमीभाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत असलेल्या कांदा मार्केटमध्ये मोकळा कांदा लिलाव सुरू आहे. जिल्ह्यातील विविध भागातून कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्रीसाठी येथे आणत आहेत. कांदा मार्केटमध्ये लाल कांद्याची आवक स्थिर आहे. मात्र, लाल कांद्याला भाव वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांची मोठी निराशा झाल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी उन्हाळी कांद्याप्रमाणे लाल कांदा चाळीत साठवू शकत नाहीत. शेतात लाल कांद्याची काढणी करून शेतातूनच मार्केटला विक्रीसाठी आणावे लागते. मात्र, दिवसेंदिवस लाल कांद्याच्या भावाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.
बाजारात एकीकडे कांद्याची आवक वाढली असताना आंध्रप्रदेश, तामिळनाडू, ओडिसा, केरळ, पंजाब, कर्नाटक आदी राज्यांतून मागणी घटली आहे. त्याचा स्थानिक बाजारात परिणाम दिसून येत आहे. शासनानेच आता कांद्याला हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
सातत्याने दरात घट
■ २० जानेवारी रोजी लासूर स्टेशनच्या कांदा मार्केटमध्ये लाल कांद्याचा भाव नंबर १ साठी सरासरी १३५० रुपये क्विटल होता.
■ तर नंबर २ साठी १ हजार रुपये होता. ११ फेब्रुवारी रोजी लाल कांद्याचा भाव नंबर १ साठी सरासरी ८२५ रुपये क्विटल होता. तर २ नंबरसाठी ५५० रुपये होता.
Source: uttamsheti