सोलापुर : उन्हाळ्याची झळ जशी जाणवू लागली आहे. तशी बाजारात लिंबाची मागणी वाढली आहे. लिंबाचा वापर खाण्यासाठी आणि सौंदर्यासाठी केला जात असून चांगले उत्पन्न मिळवून देण्यासाठी लिंबू शेती हा एक उत्तम पर्याय आहे. हे सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शेतात लिंबूची लागवड करून एकरी 10 लाखांचे उत्पादन घेऊन दाखवून दिले आहे.
मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) येथील अमोगसिद्ध कुंभार आणि बसवराज कुंभार यांनी एका एकरात जवळपास 250 रोपांची लागवड केली आहे. अडीचशे रोपांमधून हजारो लिंबूचे उत्पन्न होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात लिंबाचे भाव वाढल्यानं त्यांना मोठा फायदा होत आहे. लिंबाची एक बॅग 10 हजार रुपयांना विकली जात आहे. कागदी लिंबाला अधिक मागणी असल्याने सोलापुरातील कागदी लिंबू कोल्हापूर, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्यात विकली जात आहेत. बाजारात एक कागदी लिंबू जवळपास 10 रुपयांना विकत मिळत आहे. चांगले उत्पन्न मिळवून देण्यासाठी लिंबू शेती हा एक उत्तम पर्याय आहे. तर लिंबू शेती करून कमीत कमी खर्चात जास्त नफा मिळतो. आपल्या आरोग्यासाठी लिंबू सेवन करणे हे खूप चांगले मानले जाते, असं कुंभार भावंडांनी सांगितलं.
कशी करावी लागवड?
लिंबाची लागवड करण्यासाठी 20 ते 40 सेंटीग्रेड तापमानाची आणि 75 ते 200 सें.मी. पर्जन्यमान असलेल्या भागात लिंबाची लागवड चांगली होते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी हे समृद्ध फळ आहे. तर, शेतकऱ्यांनी लिंबू लागवड शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास भरघोस उत्पादन घेता येऊ शकते असंही कुंभार भावंडं सांगतात.
लिंबू लागवडीसाठी जमिनीचे पीएच मूल्य 5.5 ते 6.5 दरम्यान असावे. लिंबू हे सर्व प्रकारच्या सुपीक जमिनीत घेतले जाऊ शकते. शेतातील चिकणमाती उत्पादनासाठी चांगली असते. जुलै ते ऑगस्ट या दरम्यान लिंबाची रोपे लावण्यासाठी योग्य वेळ असतो. तर लिंबाची लागवड करण्यात आधी जमीन दोन-तीन वेळा खोल नांगरट करून घ्यावी. लिंबांच्या सुधारित जातीमध्ये कागदी लिंबू, गोड लिंबू ,बारामासी या जाती आहेत. लिंबांच्या झाडांना उन्हाळ्यात 10 दिवस आणि हिवाळ्यात 20 दिवसांच्या अंतराने पाण्याची गरज भासते.
उष्णता वाढल्याने लिंबूच्या मागणीत वाढ झाली
एप्रिल पासून वातावरणातील उष्णताही वाढली आहे. शीतपेये, लिंबूपाणी पिण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात अचानक लिंबांची मागणी वाढली आहे. घाऊक बाजारात 200 ते 300 रुपये शेकडा या दराने लिंबू मिळत आहे. घाऊक बाजारात दर वाढल्याने लगेचच किरकोळ बाजारात लिंबू पाच रुपये एक या दराने विकले जात आहेत.
source:- lokmat