IMD Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमानात (temperature) सातत्याने वाढ होत आहे. विविध शहरांतील कमाल तापमान चाळीसच्या पुढे गेले असले तरी आज राज्याचे कमाल तापमानाचा पारा चाळीशीच्या आत मध्ये आहे.
त्यातच आता पुढील पाच दिवसात पुन्हा एकदा पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. तर विदर्भातही वाशिम आणि बुलढाण्यात गारपीटीसह मुसळधार पाऊस (Heavy rain with hail) सुरू आहे. दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून कोणत्याही क्षणी मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पदरी पुन्हा निराशाच पडणार आहे…
आज राज्यातील विविध शहरांमध्ये कमालीचे तापमान असताना राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे 39.4 अंश सेल्सिअस एवढी झाली. परिणामी राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामध्ये कोकण विभाग वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात 24 ते 26 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ किंवा राज्यातील शहरांमध्ये तापमानात कमालीची तफावत जाणवली आहे.
मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये पावसाची शक्यता
पूर्व-पश्चिम भारतात तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहे. याशिवाय मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगडमध्ये पाच दिवस हलका पाऊस पडेल. बिहार, झारखंड, बंगाल, सिक्कीम, ओडिशामध्ये पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे.
असं असेल मुंबई-ठाण्यातील तापमान
कोकण आणि मुंबई-ठाण्यातील तापमान पुढील दोन-तीन दिवस कोरडे राहणार आहे. ओलसर हवा, जास्त आर्द्रता आणि तापमानामुळे कोकणात तापमानात वाढ होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. तसेच ठाणे आणि मुंबईत वातावरण कोरडे राहणार असले तरी आर्द्रतेमुळे उष्णतेची शक्यता आहे.
अवकाळी पावसाचे कारण काय?
मध्य महाराष्ट्रापासून तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात अचानक हवामानात बदल झाला. तेलंगणापासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत कमी दबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी हवेतील दमटपणा कमी झाला आहे. केवळ पुढील चार दिवस तापमानात कमालीची वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात हवामान क्षेत्र कायम राहणार असल्याचे पुणे वेधशाळेने जाहीर केले आहे.
source: zee24taas