शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यात लवकरच लागू होणार पोकरा 2.0, तब्बल ‘इतक्या’ कोटींचा मिळणार निधी

 दहा हजार कोटी रुपयांच्या निधीसह पोकरा 2.0 अर्थात नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी (Pocra) ही योजना राबवण्यात येणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. हिंगोली येथील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, त्यातून आर्थिक लाभ व्हावा यासाठी प्रत्येक सरकार प्रयत्न करत असते. आहेत.महाराष्ट्र सरकारही शेतकऱ्यांच्या उन्नती करता विविध योजना राबवत असते. त्यापैकीच एक म्हणजे पोकरा (Pocra) ही योजना आहे.

तब्बल 10 हजार कोटींचा निधी
पोकरा या योजनेलाच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना असंही नाव आहे. ही योजना 2018 साली सुरू करण्यात आली होती. त्यावेळी या योजनेसाठी 4000 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती. ही योजना पुढे सुरू राहील की नाही याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात द्विधा परिस्थिती होती. मात्र हिंगोली येथील एका कार्यक्रमादरम्यान राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, ही योजना पुढे चालू राहणार आहे. त्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल.

काय आहे पोकरा?
कृषी तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी 2018 साली महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली. तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे असा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेकरता त्यावेळी पुढील सहा वर्षांसाठी चार हजार कोटी रुपये देण्यात आले होते. सुरुवातीला यामध्ये राज्यातील 15 जिल्ह्यातील 5142 गावांचा समावेश होता. यानंतर 2021-22 साली नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अनेक गावांचा यात समावेश करण्यात आला.

काय मिळतो लाभ?
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेततळी, फळबागा लागवडी, पॉलिहाऊसेस, विविध यांत्रिकीकरणाच्या सोयी, विविध सिंचने यांच्या वापरासाठी अनुदान देण्यात येते. तसेच गटांसाठी, एफपीओ साठी ही योजना राबवण्यात येते.

काय आहे सद्यस्थिती?
यामध्ये सध्या 16 जिल्ह्यातील 5242 गावांचा समावेश होतो. आतापर्यंत या योजनेसाठी एकूण 2800 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ही योजना आता अंतिम टप्प्यात आहे. या योजनेतून अर्ज केलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या योजनेचं पुढे काय होणार असे प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारले जात होते. मात्र कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीमुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान लवकरच जमा होईल अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

source:- mieshetkari

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *