कृषिपंपांचे वीजजोड तोडू नका
मुंबई : ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊनही सुरू असलेली कृषी वीज जोड तोडणी बंद करण्याचे आदेश ‘महावितरण’ने दिले आहेत. फडणवीस यांनी चालू वीज बिल भरलेल्या आणि एका रोहित्रावरील एका शेतकऱ्याने बिल भरले तरी वीज जोड बंद करण्यात येणार नाही, असे सांगितले होते. तरीही ‘महावितरण’ची वीजजोड तोडणी मोहीम जोरात होती. मात्र, हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता गृहीत धरून ‘महावितरण’ने आता वीजजोड तोडू नयेत, असे आदेश मुख्य अभियंत्यांना दिले आहेत.
दोन दिवसांपूर्वी ‘महावितरण’च्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत अध्यक्ष विजय सिंघल यांनी या बाबतच्या सूचना दिल्या होत्या. ‘वीजजोड तोडू नका. त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. हिवाळी अधिवेशन तोंडावर असल्याने ते अधिक तीव्र असतील,’’ असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला आहे. या बाबत लेखी आदेश काढले आहेत.
सध्या रब्बीचा हंगाम सुरू असल्याने शेतीला पाण्याची गरज आहे. अशात थकबाकी असल्याने वीज जोड तोडली जात आहेत. मागील दोन महिन्यांतील आकडेवारी पाहिली असता ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये महावितरणची वसुली जोरात झाली आहे. ऑक्टोबरमध्ये ६ हजार ९२७ कोटी सहा लाखांत १५ कोटी २० लाख रुपये, तर नोव्हेंबरमध्ये ७ हजार, ९३ कोटी चार लाखांत ४०० कोटींपैकी १३४ कोटी ६३ लाख रुपयांची कृषिपंपांची वसुली केली आहे.
रब्बीचा हंगाम सुरू असल्याने विजेची गरज असताना वीजजोड तोडल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. त्याविरोधात असलेले फडणवीस ऊर्जामंत्री झाल्याने ही कारवाई का? असा सवालही केला जात आहे. त्यामुळे अधिवेशन काळात हा मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता अधिक आहे.
…असे आहेत आदेश
कृषिपंप ग्राहकांचा वीजपुरवठा चालू बिल किंवा थकबाकी वसुलीकरिता तसेच इतर कोणत्याही कारणास्तव तोडण्यात येऊ नये, असा आदेश ‘महावितरण’च्या महसूल व देयक विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी काढला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ प्रभा��ाने लागू करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
वर्षेनिहाय थकबाकीदार शेतकरी आणि रक्कम
१५ वर्षे ः तीन लाख दोन हजार : ५ हजार २१७ कोटी
१० ते १५ वर्षे ः ४ लाख चार हजार : ६ हजार ४१७ कोटी
५ ते १० वर्षे ः ७ लाख ६ हजार : ९ हजार ४३६ कोटी
२ ते ५ वर्षे ः ४ लाख : चार हजार २०९ कोटी
१ ते २ वर्षे ः ६ लाख २ हजार : ५ हजार ९८० कोटी
१ वर्षे ः १८ लाख चार हजार : १७ कोटी ४६५ सौजन्य : अॅग्राेवन