Agricultural University : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कारकीर्द प्रगती योजना अंतर्गत एकूण ५७ शिक्षकांना उच्च शैक्षणिक वेतनश्रेणी आणि शैक्षणिक स्तरावर पदोन्नती देण्यात आली आहे. अध्यापन, संशोधन आणि विविध शैक्षणिक उपक्रमांतील सातत्यपूर्ण योगदानाच्या आधारे ही पदोन्नती मिळाली असून, विद्यापीठात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही प्रक्रिया कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आणि कुलसचिव संतोष वेणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विद्यापीठाने विद्यार्थी केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन, शेतकरी केंद्रित विस्तार कार्य आणि कर्मचारी केंद्रित प्रशासन या चार प्रमुख तत्वांवर भर दिला आहे.
शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी त्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे परीक्षण अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व विविध समित्यांमार्फत सखोल पद्धतीने करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सुधारणा अधिनियम, २०२३ आणि विद्यापीठ अनुदान आयोग नियमावली, २०१० नुसार स्थापन समितीच्या शिफारशींनुसार पदोन्नती देण्यात आली.
या निर्णयानुसार सहाव्या वेतन आयोगानुसार ८ शिक्षकांना आणि सातव्या वेतन आयोगानुसार ४९ शिक्षकांना पदोन्नती मिळाली आहे. वेगवेगळ्या वेतनस्तरांमध्ये ही पदोन्नती दिली गेली असून, यामुळे शैक्षणिक व प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
कुलगुरूंनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन करत ही पदोन्नती त्यांच्या मेहनतीचे फलित असल्याचे सांगितले. ही प्रक्रिया वैयक्तिक प्रगतीसोबतच विद्यापीठाच्या गुणवत्ता आणि शिस्तबद्ध कारभाराचे द्योतक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुलसचिव संतोष वेणीकर यांनीही याला विद्यापीठाच्या सुसंघटित कार्यपद्धतीचे यश मानले आहे.
या यशस्वी प्रक्रियेसाठी उप कुलसचिव पुरभा काळे, सहाय्यक कुलसचिव राम खोबे, कक्ष अधिकारी गंगाधर चांदणे, नरेंद्र खरतडे आणि कुलसचिव कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानून अधिक जबाबदारीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.












