Demand for Compensation : शेडनेटमधील पिकांना नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी,वाचा सविस्तर..

२६ फेब्रुवारीला अकोला जिल्ह्यामधील पांगरी शिवारामध्ये शेडनेट व शेडनेटमधील पिकांचे गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानामुळे शेडनेट बीजोत्पादक शेतकरी अडचणीत आले असून कुठलीही कंपनी या पिकांचा विमा घेत नाही.

याचा परिणाम एक ते दीड लाख रुपये प्रत्येक शेडनेटधारक शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहे. अवकाळी पाऊसामुळे व गारपिटीने नुकसान झालेल्या शेडनेटधारक शेतकऱ्यांना शासनाने लवकरात लवकर पिकांची भरपाई द्यावी, अशी मागणी पांगरी गावातील २०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी केली आहे.

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी तालुक्यातील पांगरी माळी येथील बुधवारी तहसीलदारांची भेट घेत मागणी केली. शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीबाबत तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली.

पांगरी शिवारातील शेकडो शेडनेटचे २६ फेब्रुवारीला गारपीट आणि वादळी वाऱ्याने नुकसान झाले आहे. त्यातील सिमला मिरची,टोमॅटो ,मिरची, बीजोत्पादन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्व पिकांचा विमा नैसर्गिक आपत्ती झाल्यास मिळतो. परंतु कोणताही विमा शेडनेट विमा मिळत नाही व कुठल्याही प्रकारचा विमा व भरपाई कंपनीकडूनही नसल्याने शेडनेटधारक धास्तावले आहेत.शेतकऱ्यांना नुकसान होऊनही मदत भरपाई मिळत नाही.

शेडनेट उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने विशेष बाब म्हणून नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे केली आहे. निवेदन देताना लक्ष्मी वाघ, शुभम गिराम, कुलदीप वाघ, प्रदीप वाघ, बळीराम गिराम, विठ्ठल गिराम, कैलास वाघ, जयराम वाघ, कालिंदा वाघ, अनिल वाघ,अशोक वाघ, भानुदास वाघ, बद्रीनाथ वाघ, कविता वाघ, धुराजी वाघ, कुंडलिक वाघ, ज्योती वाघ, ज्ञानेश्वर वाघ, पूनम वाघ, विठ्ठल वाघ, रामकृष्ण गिराम, संजय पगार, ज्ञानेश्वर सोनुणे, अंकुश जाधव, सीताबाई वाघ, आकाश वाघ गणेश वाघ यांच्यासह असंख्य शेडनेटधारक शेतकरी उपस्थित होते.

बीजोत्पादनात पांगरी अग्रेसर

गेल्या काही वर्षांमध्ये पांगरी येथील शेतकऱ्यांनी शेडनेटमध्ये बीजोत्पादन घेऊन नाव कमावले होते . या गावामध्ये सुमारे हजारो शेडनेट आहेत.शेतकऱ्यांनी शेडनेटमध्ये बीजोत्पादनात सातत्याने परिश्रम घेत येथील आर्थिक समृद्धी मिळवली.येथील शेतकरी स्वावलंबी बनले. यामुळे रोजगार निर्मिती झाली. परंतु २६ फेब्रुवारीला झालेल्या आपत्तीने शेतकऱ्यांचे नुकसान केले.

Leave a Reply