राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दूध उत्पादकांवर जनावरे जगवण्याचे संकट निर्माण झाले आहे. बाजारातील जनावरांच्या खरेदी-विक्रीवर चारा, पाणी टंचाईचा परिणाम झाला आहे.वीस ते तीस हजारांनी दुभत्या जनावरांचे दर खाली आले आहेत. शिवाय बाजारात दर मिळत नसल्याने खरेदी-विक्रीचे हि प्रमाण कमी झाले आहे . जनावरे खरेदी विक्रीच्या नावाजलेल्या बाजारातही आवक कमी झाली आहे. राज्यभरातील ही स्थिती चिंतेची आहे.
राज्यात नाशिक, पुणे, सोलापूर, नगर, सांगली, छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा,सातारा, कोल्हापूर, विदर्भातील अनेक जिल्ह्यांत शेतकरी शेतीला पूरक जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. दुधाला मागील काही वर्षांपासून पुरेसा भाव मिळत नाही त्यामुळे पशुपालन अडचणीत येत आहेत . यंदा पाणी टंचाई,चारा टंचाई, दुष्काळ, पशुखाद्याचे वाढते दर आणि दुधाचे पडलेले दर यामुळे पशुपालक आणखीन अडचणीत येत आहेत .
या वर्षी दुष्काळी स्थितीमुळे तसेच दूध व्यवसाय परवडत नसल्यामुळे जनावरे विकण्याकडे पशुपालकांचा कल वाढला आहे. परंतु बाजारामध्ये जनावरे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे दुभत्या जनावरांच्या दरात वीस ते तीस हजारांनी (२० ते २५ टक्के)कमी झाली आहे. दुभत्या गाई, म्हशींसाठी प्रसिद्ध असलेल्या लोणी (ता. राहाता) ,घोडेगाव (ता. नेवासा), यासह अन्य गाई-म्हशीच्या बाजारात खरेदी-विक्रीवर परिणाम दिसत आहेत.
मागील महिन्यात घोडेगावला ५०० गाईंची, ४१८ म्हशीची,६०० शेळ्या, व ८०० शेळ्याची खरेदी-विक्री झाली. अन्य वेळी साधारणपणे सहाशेच्या जवळपास म्हशींची, सातशेच्या जवळपास गाई, खरेदीविक्री होत असते.
यावर्षी चाऱ्याची तीव्र टंचाई , पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने जनावरे जगवणे कठीण झाले आहे. त्यातच उन्हाळा असून आणि दुधाला मागणी असून देखील गाईच्या दुधाला पाहिजे इतका दर मिळत नाही. त्यामुळे गाय विकण्यासाठी आणली आहे. गाईच्या दरात बरीच घट झाल्याचे दिसून येत आहे.
अलमभाई शेख, दूध उत्पादक शेतकरी देवगड फाटा, ता. नेवासा, जि. नगर
दूध व्यवसाय अनेक दिवसांपासून करतो. मात्र यंदा दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. महागडी जनावरे संभाळणे कठीण आहे. चारा, पाणी टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला भाव मिळत नाही आणि सरकारी पातळीवर दखल घेतली जात नाही. त्यामुळे दुभती जनावरे विकावी लागत आहेत .
रमेश कोंडीराम पठाडे, ढोरेगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर
दुभत्या जनावरांचे सध्याचे दर (कंसामध्ये पावसाळ्यातील साधारण दर)
– बैलाचे दर : सध्या कमी आवक (४० हजार ते ८० हजार)
– दुभत्या म्हशीचे दर : नव्वद हजार ते १ लाख (१ ते सव्वा लाख)
– दुभत्या संकरित गाय :चाळीस हजार ते ६० हजार (८० हजार ते १ लाख)
भाकड जनावरे तर मातीमोल…
भाकड जनावरे संभाळण्याची उन्हाळ्यात, दुष्काळी स्थितीत जास्त अडचण असते . दररोज एका जनावरांवर प्रत्येक दिवसाला साधारणपणे शंभर रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. यंदा बहुतांश भागात चारा, पाण्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे . आर्थिक तोटा सहन करुन काही पशुपालक भाकड जनावरे संभाळत आहेत , परंतु ज्यांना संभाळणे शक्य नाही ते विक्री करतात.भाकड जनावरांना बाजारात कोणी विचारत नाही. भाकड जनावरे बाजारात न विकता गोवंशीय जनावरांसाठीचा कायद्यामुळे घरीच विकली जात आहे.त्यांची किंमत मात्र यंदा मातीमोल होत आहे.