Maharashtra agriculture minister : महाराष्ट्राचा संभाव्य नवा कृषीमंत्री कोण होणार? कोणाकडे जाणार कृषीखाते?

Maharashtra agriculture minister : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उद्या दिनांक ५ डिसेंबर २४ रोजी मुहूर्त लागला आहे. भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस असतील याचे संकेत मिळत असले, तरी अजून त्यांचे नाव नक्की झालेले नाही. दरम्यान या सर्वात कोणाकडे कोणते खाते असेल? याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जुन्या मंत्रिमंडळाप्रमाणेच यंदाही खाते वाटप होण्याची शक्यता आहे. मात्र त्यावर अजून भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी एकत्रित बसून विचार विनिमय केलेला नाही. आज किंवा उद्यापर्यंत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद भाजपाकडे, तसेच महसूल मंत्रीपदही भाजपाकडेच राहण्याची शक्यता आहे. याशिवाय सामान्य प्रशासन, सहकार मंत्री पद हेही भाजपाकडे राहिल अशी शक्यता व्यक्त होताना दिसत आहे. एकूणच भाजपाकडे मुख्यमंत्री, गृहमंत्री पदासह २० पेक्षा जास्त मंत्रिपदे असतील. दुग्धविकास मंत्रालय आणि फळबाग व रोजगार हमी ही खातीही पूर्वीप्रमाणेच भाजपा आपल्याकडे ठेवेल असेही सांगितले जाते आहे.

अर्थमंत्रीपदासह, सिंचन, जलसंपदा, अन्न व नागरी पुरवठा अशी काही खाती आणि उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. विधानसभेचे उपाध्यक्षपदही त्यांना मिळू शकते.

कृषी मंत्री, पणन मंत्री, परिवहन, नगरविकास, आरोग्य अशी काही खाती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळेल. स्वत: एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास हे खाते आपल्याकडे ठेवतील अशी शक्यता आहे. कृषी मंत्रीपदी पूर्वीप्रमाणेच या खात्याचा अनुभव असणारे नाशिक जिल्ह्यातील दादाजी भुसे यांचा विचार होऊ शकतो, असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. तर पणन खात्यासाठी वादग्रस्त ठरलेले अब्दुल सत्तार यांचा पत्ता यंदा कट होऊ शकतो, अशीही चर्चा आहे.

Leave a Reply