आज गुरूवारी या नाराजीचा उद्रेक झाला असून देशातील सर्वात मोठे कांदा मार्केट म्हणजेच लासलगावला आज कांदा उत्पादकांनी लिलाव बंद पाडून आंदोलन केले. कांदा बाजारभावात सुधारणा झाली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र होईल असा इशारा शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी दिला आहे.
सकाळी नेहमीप्रमाणे बाजारसमितीत कांदा लिलाव सुरू होण्याची तयारी होती. मात्र शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारून हे लिलाव बंद पाडले आणि काही काळ धरणे दिले. सध्या बाजारात सामान्य ग्राहकांना कांदा अजूनही ५० ते ७० रुपयांना प्रति किलो मिळत आहे. दुसरीकडे शेतकऱ्याला मात्र केवळ ३ रुपये ते २० रुपये किलोचा भाव मिळताना दिसतोय. त्यातून शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघत नाही.
आपली व्यथा मांडताना एक आंदोलक शेतकरी म्हणाले की आम्ही कांद्यासाठी आमच्या कुटुंबासह राबतो. जेव्हा कांद्याचा ट्रॅक्टर आम्ही बाजारात आणतो, तेव्हा आमच्या कुटुंबातील प्रत्येकाला आज चांगला दर मिळेल अशी अपेक्षा असते. म्हणूनच आम्ही घरी जातो, तेव्हा मुलं विचारतात, पप्पा आज काय भावाने गेला आपला ट्रॅक्टर? हजार रुपयांनी विकला असं सांगताना आमच्या डोळ्यांत पाणी येतं आणि घरचेही नाराज होतात. ही प्रत्येक शेतकऱ्याच्याच घरची व्यथा आहे.
कांद्याचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकारी धोरणे कारणीभूत असून त्यांनी त्वरित या संदर्भात निर्यातमूल्य काढून टाकावे, तसेच मागील दहा दिवसात भाव पडलेल्या कांद्याचे प्रति क्विंटल २ हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात टाकावेत. नाफेड एनसीसीएफची खरेदी बंद करावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली. निवडून आल्यावर लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे हे आंदोलन शेतकऱ्यांनी केले आहे. बाजारभाव सुधारले नाही आणि निर्यातीवरचे शु्ल्क दोन दिवसात हटवले नाही, तर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशाराही शेतकरी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी दिला.
दरम्यान आज सकाळी लिलाव सुरू होताना १७०० ते १८०० रुपयांना प्रति क्विंटल दर पुकारल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी लिलाव बंद पाडत आंदोलन केल्याचे समजते. कालही उमराणे येथे शेतकऱ्यांनी अशीच आक्रमक भूमिका घेऊन तेथील कांदा लिलाव बंद पाडले होते.02:34 PM