Poultry farming : सध्याच्या वातावरणात पोल्ट्री शेडमधील पडद्यांचे महत्त्व समजून घ्या…

Poultry farming:  सध्याच्या ढगाळ, धुके आणि थंडीच्या वातावरणापासून कुक्कुटपालनातील कोंबड्यांचे वेळीच संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या तज्ज्ञांनी विविध उपाय सुचवले आहेत.

कोंबड्यांचे अती थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेडच्या लांबीच्या बाजूने असलेल्या जाळीस स्वच्छ व कोरडे पडदे लावावेत. पडद्यांची उघडझाप सहज करता यावी. पडदे रात्री व पहाटे थंड हवेच्या वेळी बंद करावेत. दुपारी थोडी उष्णता असते त्यावेळी पडदे उघडावेत.

शेडमध्ये योग्य वायुवीजन व खेळती हवा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी ज्या वेळेस शक्य आहे, अशा वेळेस पडद्यांची उघड-झाप वरून खाली करावी. तसे केल्यास कार्बन डायऑक्साइडयुक्त दूषित हवा पटकन बाहेर फेकली जाते.

अशी दूषित हवा बाहेर न टाकल्यास आणि कोंबड्यांना ऑक्सिजनयुक्त (स्वच्छ) हवा उपलब्ध न झाल्यास त्यांना हायपोक्सीया (ऑक्सिजनची कमतरता) होतो. जलोदरसारखे चयापचयाचे आजार होतात, मरतूक वाढते.

कोंबड्या शेडवर आल्यानंतर साधारण तिसऱ्या आठवड्यापासून जलोदरचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होते. शेडला लावलेल्या पडद्यांचे उघडझाप करण्याचे नियोजन योग्य न केल्यास, शेडमधील तयार होणारा अमोनिया बाहेर फेकला जात नाही, त्यामुळे शेडमधील अमोनियाचे प्रमाण वाढून कोंबड्यांना श्वसन संस्थेचे आजार होतात, डोळ्यांना त्रास होतो.

यामुळे खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होऊन वजनात घट होते, औषधांचा खर्च वाढतो. म्हणून हिवाळ्यामध्ये शेडला लावलेल्या पडद्यांचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *