
dhanajay munde : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख् यांच्या हत्येनंतर वातावरण अजूनही तापलेले आहे. दरम्यान मराठा मोर्चा आणि मनोज जरांगे यांनी या प्रकरणावर आंदोलनाची भूमिका घेतली असून आतापर्यंत बीडनंतर जालना, परभणी येथे मोठ मोठे मोर्चे या हत्येच्या निषेधात निघाले आहेत. दुसरीकडे देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबियांसह गावकऱ्यांनीही आंदोलन तीव्र केले आहे.
या सगळ्याचा परिणाम म्हणजे काल प्रमुख सूत्रधार असल्याचा संशय असलेल्या वाल्मिक कराडवर मकोकासह खूनाचा गु्न्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याच्या समर्थकांसह कुटुंबियांनी परळीत आंदोलन करत गाव बंद ठेवले. त्यातून पुन्हा राज्याचे वातावरण तापले असून हे प्रकरण भविष्यात सरकारच्या अंगलट येणार अशी चिन्हे आहेत. दरम्यान विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणी धनंजय मुंडेवर आरोप केले असून त्यांचा राजीनामा मागितला आहे, इतकेच नव्हे, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे.
अमित शाहांच्या कानपिचक्या की मुंडेंना सूचक इशारा…
दुसरीकडे भाजपाच्या वरिष्ठ स्तरावरून आता या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसह राज्यातील सरकारवर दबाव येत असून धनंजय मुंडेंचा लवकरच राजीनाम पडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शिर्डी येथील भाजपाच्या मेळाव्यात १२ जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या सदस्यांची वेगळी बैठक घेऊन त्यांना स्वत:ची प्रतिमा चांगली ठेवण्याबाबत कानपिचक्या दिल्याचे समजते. मात्र त्यांचा रोख पूर्णपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे असल्याचे समजते. त्यानंतरच इतक्या दिवस वाल्मिक कराडवर गुन्हा नोंदविण्याचे थांबलेले सरकार कार्यरत झाले आणि खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आल्याचे समजते.
अजित पवारांचीही नाराजी?
दरम्यान परळीत जाण्यापूर्वी काल संक्रांतीला धनंजय मुंडे यांनी दहा मिनिटांसाठी उपमुख्यमंत्री आणि राष्टऽवादीचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेतली. परळीत वाल्मिक समर्थकांनी केलेल्या आंदोलनामुळे सरकार आणि स्वत: अजितदादा नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट होती. त्यानंतर पवार यांनी मुंडे यांची कानउघाडणी केल्याचे समजते. मात्र याबद्दल खात्रीची माहिती मिळू शकलेली नाही. असे असले, तरी भाजपा आणि आता दस्तुरखुद्द राष्ट्रवादीतून मुंडे यांना विरोध होऊ लागल्याने त्यांचा पाय खोलात असल्याची चिन्हे असून त्यांच्यावर गुन्हाही नोंदला जाऊन मंत्रिपद गमावण्याची वेळ येईल अशी चर्चा सध्या भाजपाच्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.