
kanda bajarbhav: संक्रांतीच्या बाजारसमित्यांच्या सुटीनंतर आजपासून सोलापूरचे मार्केट पुन्हा सुरू होत आहे, तर दुसरीकडे इतरही बाजारसमित्या पुन्हा सुरू झाल्याने कांदा बाजारभावावर परिणाम झाला आहे. असे असले, तरी आज सकाळच्या सत्रात म्हणजेच दिनांक १६ जानेवारी २५ रोजी काही बाजारात कांद्याचे बाजारभाव टिकून आहेत.
आज सकाळी पुणे बाजारसमितीत दहा हजार क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. कमीत कमी दर १४०० रुपये, जास्तीत जास्त २६०० रुपये, तर सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला. काल दिनांक १५ जानेवारी रोजी कांद्याला येथील बाजारात सरासरी २ हजाराचा दर मिळाल्याने बाजारभाव टिकून राहिले.
मात्र पुणे जिल्ह्यातील मोशी बाजारात आज सकाळच्या सत्रात कांद्याचे बाजारभाव सरासरी १२५० असे राहिले. कालच्या तुलनेत त्यात घट झाल्याचे दिसून आहे. पिंपरी बाजारातही कांद्याची आवक अवघी ९ क्विंटल झालेली असताना बाजारभाव सरासरी १३०० रुपये इतके घसरले आहेत.
दरम्यान आज सकाळी नाशिक जिल्हयात लासलगाव बाजाराची उपबाजार समिती असलेल्या निफाड बाजारात लाल कांद्याला १९५० रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव मिळाले. कालच्या तुलनेत येथे बाजारभाव टिकून आहेत. तर लासलगाव बाजारात सकाळी सुमारे १५ हजार क्विंटल लाल कांदा आवक झाली. मंगळवारच्या तुलनेत येथे दरात दोन रुपयांची घसरण झाली असून आज सरासरी १७५० रुपये प्रति क्विंटल दर सकाळच्या सत्रात मिळाला.