
kanda bajarbhav: मागील आठवड्यात देशपातळीवरील कांदा आवक कमी राहिल्याने सध्या कांद्याच्या दरात स्थैर्य असल्याचे दिसून येत आहे. संक्रातीच्या सुटीमुळे देशपातळीवरील कांदा आवक १३ ते १५ जानेवारी या दरम्यान १ लाख टन होती. त्यात सर्वाधिक वाटा अर्थातच महाराष्ट्राचा होता. त्याखालोखाल गुजरात आणि नंतर उत्तर प्रदेशच्या कांद्याचा होता. या आठवड्यात पहिल्या तीन दिवसातच त्यात वाढ झाली आहे.
गुजरामधून येणाऱ्या कांद्याची आवक ही मागील आठवड्याच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाली आहे. तर राज्यातील आवकही दीडपट झाली आहे. मध्यप्रदेश, कर्नाटक येथील आवक या तीन राज्यांच्या तुलनेत कमी आहे.
असे असले तरी एकूण देशपातळीवरचा विचार करता कांदा आवक स्थिर राहिल्याने सोमवार ते बुधवारपर्यंत भाव टिकून राहिले आहेत. याचे कारण म्हणजे कांद्याची मागणी आता वाढत असून निर्यातही सुरळीत आहे. खरीप हंगामाचा कांदा संपत आला असून लेट खरीप कांदा बाजारात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळेही आवकेत वाढ झाली आहे.
कुठे किती दर मिळाला:
बुधवारी लासलगावच्या निफाड बाजारात लाल कांद्याला सरासरी २४११ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. मंगळवारच्या तुलनेत कांद्याचे बाजारभाव वधारलेले दिसून आले. येवला तालुक्यात येवला आणि अंदरसूल बाजारात लाल कांद्याला सरासरी २ हजाराचा दर मिळाला. सिन्नर बाजारात २ हजार, नामपूर करंजाड बाजारात २ हजार, पुणे बाजारात २३०० रुपये, मांजरी बाजारात २६०० रुपये, तर पिंपळगाव बसवंतला २२५० रुपये प्रति क्विंटल असा दर होता. तर लासलगाव बाजारात सरासरी २३०० रुपयांचा दर मिळाला.
राज्यात किती आवक..
बुधवारी राज्यात कांद्याची एकूण २ लाख ३० हजार ४१० क्विंटल आवक झाली. त्यापैकी नाशिक जिल्हयात १ लाख ३० हजार आवक झाली, सोलापूर जिल्हयात सुमारे २८ हजार क्विंटल, तर पुणे जिल्ह्यात सुमारे १५ हजार क्विंटल आवक झाली. मंगळवारी २१ जानेवारी रोजी राज्यात सुमारे ३ लाख १३ हजार क्विंटल आवक झाली. त्यापैकी नाशिक जिल्ह्यात सुमारे दोन लाखावर आवक झाली, सोलापूर जिल्हयात ३० हजार तर पुणे जिल्ह्यात सुमारे १५ हजार क्विंटल आवक झाली. सोमवारी दिनांक २० जानेवारी रोजी राज्यात ४ लाख ८ हजार क्विंटल आवक झाली. त्यात नाशिक जिल्ह्यात २ लाख २२ हजार, पुणे जिल्ह्यात सुमारे १३ हजार, सोलापूर जिल्ह्यात ३२ हजार क्विंटल आवक झालेली पाहायला मिळाली.