
Cultivation of Dodka and Karli : दोडका आणि कारली या वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड अनेक शेतकरी करणार असतील, त्यांना उपयोगी होईल अशा काही टिप्स शास्त्रज्ञांनी दिल्या आहेत.
चांगला निचरा होणाऱ्या, भुसभुशीत, मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. लागवडीपूर्वी शेताची चांगली मशागत करून एकरी ६ टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
उन्हाळी लागवड जानेवारी ते मार्च महिन्यात करावी. लागवडीसाठी दोडक्याच्या पुसा नसदार, कोकण हरिता, फुले सुचिताय कारल्याच्या फुले प्रियांका, फुले ग्रीन गोल्ड, फुले उज्ज्वला, हिरकणी, कोकण तारा या सुधारित जातींची निवड करावी. तसेच बाजारामध्ये खाजगी कंपन्यांचे विविध उत्पादनक्षम वाण उपलब्ध आहेत.
कारले आणि दोडका लागवडीसाठी ताटी पद्धतीचा अवलंब करावा. लागवडीचे अंतर १.५ x १ मीटर ठेवावे. लागवडीसाठी दोडका, कारले या पिकाचे सुधारित वाणांचे ६०० ते ८०० ग्रॅम बियाणे लागते.
पेरणीपूर्वी बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेडाझिम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. माती परीक्षण अहवालानुसारच रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
कारली, दोडका या पिकांसाठी ताटी पद्धतीचा वापर करावा. पारंपरिक पद्धतीपेक्षा या सुधारित पद्धतीमुळे उत्पादनात वाढ मिळते.