Onion arrivals decreased : रविवारी कांदा आवक घटली; आठवडाभर बाजार टिकणार?

Onion arrivals decreased : रविवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी राज्यात कांदा आवक एकदम कमी होऊन २० हजार क्विंटलच्या आसपास आली. यासंदर्भात अजून सविस्तर आकडेवारी आलेली नसली, तरी कृषी पणन मंडळाच्या आकडेवारीनुसार रविवारची आवक घटलेली दिसून आली.

रविवारी सोलापूर, नगर आणि पुणे बाजारात कांद्याने चांगला भाव खाल्याचे दिसून आले. मागच्या आठवड्यापासून अपवाद वगळयास कांद्याचे बाजारभाव टिकून आहेत. रविवारी पुणे बाजारसमितीत १९ हजार ४९४ क्विंटल लोकल वाणाच्या कांद्याची आवक झाली. कमीत कमी बाजारभाव १५००, जास्तीत जास्त ३ हजार, तर सरासरी २२५० रुपये असे होते. इतर दिवसांच्या तुलनेने पुण्यात कांद्याचे भाव काहीसे वधारलेले दिसून आले.

दरम्यान जुन्नर नारायणगाव बाजारात कांद्याला किमान २१०० रुपये, कमाल ३ हजार तर सरासरी २५०० रुपये बाजारभाव मिळाला. आळेफाटा बाजारात सरासरी २२५० रुपये बाजारभाव मिळाला, ओतूर बाजारात लाल कांद्याचे भाव ३ हजाराच्याही पलिकडे गेलेले पाहायला मिळाले. या ठिकाणी किमान २ हजार, कमाल ३२५०, तर सरासरी २८०० रुपये बाजारभाव मिळाले. राज्यातील इतर बाजाराच्या तुलनेत ओतूरला रविवारी बाजारभाव चांगले असल्याचे दिसून येते. पुण्यातील मांजरी बाजारात सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटल, मोशी बाजारात सरासरी १४०० रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव मिळाले.

सातारा बाजारात सरासरी १७५० रुपये बाजारभाव मिळाले. राहता बाजारात २३०० रुपये सरासरी बाजारभाव मिळाले. सोलापूरच्या मंगळवेढा बाजारात सरासरी २४०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले.

सोमवारपासून बाजारभाव वाढणार कि स्थिरावणार…
बाजारभाव विश्लेषणावरून असे दिसून येते की रविवारी जर आवक कमी राहिली आणि इतर दिवशी आवक दोन ते अडीच लाख क्विंटल (संपूर्ण राज्यातील) राहिली, तर बाजारभाव टिकून राहतात. मात्र तिच आवक दररोज सरासरी २ लाख क्विंटलच्या खाली गेली तर बाजारभाव वाढतात. हे लक्षात घेतले, तर रविवारची आवक कमी आणि बाजारभाव वाढलेले दिसून येत असून सोमवारी काही बाजारात हेच बाजारभाव टिकून राहू शकतात, तर येणाऱ्या आठवडाभर बाजारभाव वाढूही शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply