kanda bajarbhav: मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांदा आवक सरासरी २ ते सव्वा दोन लाख क्विंटलच्या आसपास स्थिर राहिल्याने कांदयाचे बाजारभाव वाढले आहे. काल शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी कांद्याची आवक १ लाख ७७ हजार ८०० क्विंटल अशी होती. काल अनेक बाजारात कांद्याचे सरासरी बाजाराने दोन हजाराचा दर ओलांडल्याचे दिसून आले. या आठवड्यात सोमवारपासून राज्यातील रोजची कांदा आवक हळूहळू घटताना दिसून आली. त्यामुळे दरातही प्रत्येक दिवशी दीड ते दोन रुपयाची वाढ झाली.
शुक्रवारी नगर जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची सुमारे ८ हजार क्विंटल आवक झाल्याच दिसून आले. पारनेर बाजारात साडेसात हजार क्विंटल उन्हाळी कांदा दाखल झाला. या ठिकाणी कमीत कमी ५०० रुपये, जास्तीत जास्त ३५०० रुपये आणि सरासरी २२५० रुपये बाजारभाव मिळाला. अकोले बाजारात ६१० क्विंटल उन्हाळी कांदा दाखल झाला. कमीत कमी ६५१ रुपये, जास्तीत जास्त ३७०० आणि सरासरी २८०० रुपये बाजारभाव मिळाला.
नाशिक बाजारात शुक्रवारी पोळ कांद्याची सुमारे १७०० क्विंटल आवक होऊन कमीत कमी १२५० रुपये, जास्तीत जास्त ३४०० रुपये आणि सरासरी २७९० रुपये बाजारभाव मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला सरासरी २९०० रुपये, जास्तीत जास्त ३६३२ रुपये, तर किमान १ हजार रुपये बाजारभाव मिळाला. या ठिकाणी सुमारे १४ हजार २०० क्विंटल पोळ कांदा आवक झाली.
दरम्यान लासलगाव बाजारात काल लाल कांद्याची सुमारे १९८३३ क्विंटल आवक झाली, कमीत कमी १५०० रुपये, जास्तीत जास्त ३५३५, तर सरासरी ३१०० रुपये बाजरभाव मिळाले. पुणे बाजारात सरासरी २४०० रुपये बाजारभाव मिळाले, जुन्नर नारायणगाव बाजारात २३०० रुपये, राहता बाजारात २३५० रुपये सरासरी बाजारभाव मिळाला. सोलापूर बाजारात सरासरी २ हजार रुपये बाजारभाव मिळाला. या आठवड्यातील हा सर्वाधिक सरासरी बाजारभाव होता.












