Onion cultivation : कृषी २४ विशेष फिचर
अलीकडेच रब्बीचा कांदा वाढला असल्याची आकडेवारी विविध माध्यमांनी देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घाबरवून सोडले होते. कांद्याचे भाव पडल्यास स्वस्तात कांदा घेऊन यंदा प्रचंड नफा कमावता येईल या हेतूने व्यापारी आणि निर्यातदारांच्या तोंडाला या आकडेवारीमुळे पाणी सुटले होते. पण प्रत्यक्षात दोन आठवड्यानंतर केंद्रीय कृषी मंत्रालयाने आपल्याच मागच्या आकडेवारीवरून घुमजाव केल्याचे ताज्या आकडेवारीवरून पुढे आले आहे. त्यामुळे रब्बीच्या एकूण पेऱ्याबद्दलच आता गोंधळ निर्माण झाला असून आकडेवारी कुणासाठी फुगवली? असा प्रश्न आता जाणकार शेतकरी विचारत आहेत.
मागील आठवड्यात रब्बीचे कांदा क्षेत्र वाढले असून उत्पादनही वाढले अशा बातम्यांनी विविध माध्यमांवर धुमाकूळ घातला होता. त्यातही राज्यात यंदा पाच लाख हेक्टरपेक्षा जास्त उन्हाळी कांदा लागवड असून उत्पादन १०० लाख मे. टन येण्याची शक्यता तथाकथीत आकडेबहाद्दरांनी वर्तविली होती. त्यामुळे यंदाच्या उन्हाळी कांद्याचे बाजारभाव पडतील असे सांगण्यात येत होते. मात्र आता हे क्षेत्र काही हजार हेक्टरने पुन्हा कमी दाखवले आहे.
१० फेब्रुवारी २५ पर्यंतच्या रब्बी लागवड व पेऱ्याचा ताजा अहवाल आयसीएआर आणि केंद्राने प्रसिदध केला असून त्यात एकूण रब्बी कांदा लागवडीचे क्षेत्र हे ९. ६७ लाख हेक्टर हे मागच्या इतकेच दाखवले असून मागच्या वर्षीचे क्षेत्र मात्र मागील अहवालात कमी दाखवले होते. ते यंदा वाढवले आहे. म्हणजेच मागच्या वर्षी ८.४० लाख हेक्टर कांदा लागवड झाल्याचे नव्या आकडेवारीत दाखवले आहे. त्यातून मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी १.२७ हजार कांदा लागवड वाढली असे दिसून येत आहे. मागच्या आठवड्यातील रिपोर्टनुसार हीच आकडेवारी कमी असल्याने यंदाची रब्बी कांदा लागवड तब्बल १ लाख ६७ हजार हेक्टरने वाढल्याचे दिसत होते. मागच्या वर्षाची कांदा लागवड केवळ ८.०१लाख हेक्टर अशी मागच्या अहवालात दाखवल्याने गोंधळ झाला. दरम्यान किरकोळ अपवाद वगळता आता उन्हाळी लागवडी संपल्या आहेत. मात्र आकडेवारीचा गोंधळ असल्याने नेमका किती कांदा बाजारात येईल याबद्दल शंका आहे.
दरम्यान शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अनेकांनी उशिरा पेरण्या केलेल्या आहेत, तर काहींना करपासारख्या रोगाचा सामना करावा लागला. काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसल्याने उत्पादन घटणार आहे. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने कांदा पूर्ण पोषण करू शकणार नाही. त्यामुळे उत्पादन घटू शकतो असा अनुभव शेतकऱ्यांनी सांगितला आहे.












