TDS scam : कांदा घोटाळ्यानंतर राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांचा टीडीएस घोटाळा?

TDS scam

TDS scam : नाफेड आणि एनसीसीएफसाठी कांदा खरेदी करताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी न करता बाजारातून किंवा कागदोपत्री कांदा खरेदी करणाऱ्या काही भ्रष्ट्र एफपीओंचा अर्थात फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांचा मोठा घोटाळा गेल्या वर्षभरात समोर आला होता. त्यानंतर अलीकडेच नाफेडने अशा सहा कंपन्यांवर कारवाई करत त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे, तर एनसीसीएफने १५ घोटाळेबाज कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे.

दरम्यान कांदा खरेदी घोटाळ्यानंतर आता एफपीओंचा अर्थात शेतकरी उत्पादक कंपन्यांचा मोठा घोटाळा समोर आला असून हा घोटाळा काही लाखात असल्याचे समजते. नाशिक आणि जळगावमध्ये जाळे पसलेल्या एक-दोन फेडरेशनने हा घोटाळा केल्याचा संबंधित शेतकरी उत्पादन कंपन्यांनी आरोप केला आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी फेडरेशनला कांद्यासह विविध प्रकारचा माल पुरवला होता. मागील तीन वर्षात संबंधित कंपन्यांना त्याचे पेमेंट देताना संबंधित फेडरेशन आणि एफपीओने शेतकरी उत्पादक कंपन्यांचा टीडीएस कापून घेतला होता. सुरूवातीला हा प्रकार कंपन्यांना नियमानुसार वाटत होता. मात्र जेव्हा शेतकरी कंपन्यांनी आयकर विभागाकडे कापून घेतलेल्या टीडीएसचा परतावा घेण्यासाठी अर्ज केला, तेव्हा आपल्या खात्यावर असा कोणताही टीडीएस जमाच झाला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

पुढे पुन्हा पैसे येतील या अपेक्षेने सुरूवातीला या कंपन्यांनी या विरोधात तक्रार केली नाही, मात्र नंतरचे दोन वर्ष असाच प्रकार सुरू राहिला असून आता टीडीएसची ही रक्कम ५० ते ६० लाखांच्याही वर असून संबंधित फेडरेशनने ते अजूनही जमा केलेले नसल्याचे उत्पादक कंपन्यांच्या संचालकांचे म्हणणे असून टीडीएस परतावा वेळेत न मिळाल्याने या कंपन्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या चळवळीलाच मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान टीडीएस घोटाळा करणारे शेतकरी उत्पादकांचे फेडरेशन हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून त्या जोरावर या फेडरेशने अनेक उद्योग केल्याचे समजते. सुरूवातीला नाफेड आणि एनसीसीएफच्या घोटाळ्यातही या फेडरेशनचा सहभाग होता मात्र मागील वर्षी अनियमिततेचे आरोप करत नाफेड आणि एनसीसीएफने या फेडरेशनला कांदा खरेदीचे काम नाकारल्याचे एफपीओंचे म्हणणे आहे, मात्र त्याबद्दल पुष्टी होऊ शकली नाही.

Leave a Reply