Rabi crops : या सप्ताहात हवामान होतेय कोरडे; रब्बी पिकांची अशी घ्या काळजी..

Rabi crops : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे.

रब्बी ज्वारी पिकास कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात.

उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.

फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. गहू पिकास दाण्यात दुधाळ पीक अवस्था (पेरणी नंतर 80 ते 85 दिवस) व दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. गहू पिकात खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा प्रादूर्भाव जास्त असल्यास सायपरमेथ्रीन 10% ईसी 10 मिली किंवा क्विनॉलफॉस 25% ईसी 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.

गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

Leave a Reply