Kanda Rate : राज्यातील एकूण आवक काल मंगळवार दिनांक ४ मार्च रोजी सोमवारच्या तुलनेत घटलेली दिसून आली. काल केवळ २ लाख ६ हजार क्विंटल कांदा आवक झाली. नाशिक जिल्ह्यातही लाल कांद्याची आवक घटून काल ती ९० हजार क्विंटल अशी होती. अहिल्यानगर जिल्हयात अवघी ४ हजार क्विंटल आवक होती. दरम्यान काल नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याला सरासरी दोन हजार रुपये तर उन्हाळी कांद्याला सरासरी २१०० रुपये प्रति किलोचा दर मिळाला. पुण्यात सरासरी २२०० रुपये तर सोलापूरला सरासरी १८०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
कांद्याची लासलगाव बाजारातील मागील सप्ताहातील सरासरी किंमती रु. २३५० प्रती क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत ३% घट झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या आबकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे ३.७२% व १०.८१% इतकी घट झाली असल्याचा साप्ताहिक अहवाल कृषी विभागाच्या बाजार माहिती व्यवस्थापन आणि जोखीम निवारण कक्षाने दिला आहे. मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी लासलगाव बाजारात कांद्याच्या सरासरी किंमत सर्वाधिक रु. २३५०/क्विंटल होती, तर अहमदनगर बाजारात सर्वात कमी किंमत रु. १६३८/क्विंटल होती.
दरम्यान देशपातळीवरील आवकेचा विचार करता सोमवारी आठवड्याच्या सुरूवातीला देशभरातील एकूण कांदा आवक ६२ हजार ३५ टन होती. त्यापैकी गुजरातमधील आवक १९ हजार ९०० टन होती. त्या खालोखाल उत्तर प्रदेशची आवक सुमारे ५ हजार मे. टन, तर मध्यप्रदेशची आवक ही सुमारे ३ हजार मे. टन इतकी होती. तर मंगळवारी दिनांक ४ मार्च रोजी देशपातळीवरील आवक आणखी घटून ४३ हजार ४४८ टन इतकी झाली. पैकी गुजरामधील आवक ही घटली आणि ती १३ हजार ८४० टन इतकीच होती.












