Chief Minister Shinde : मुंडे, कोकाटेंवरील लक्ष हटविण्यासाठीच औरंगजेब आणि अबू आझमीची खेळी?

Chief Minister Shinde : विधीमंडळाचे अधिवेशन ३ मार्चपासून सुरू झाले, मात्र गुन्हेगार वाल्मिक कराडशी जवळचा संबंध असलेले धनंजय मुंडे आणि शिक्षा ठोठावलेले कृषी मंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधक सरकारची कोंडी करणार होते. मात्र त्याच वेळेस समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी अगदी अचूक टायमिंग साधत औरंगजेबावर भाष्य केल्याने विरोधकांच्या विरोधाची सर्व दिशा ही अबू आझमीच राहिली. त्यामुळे स्वाभाविकपणे मुंडे आणि कोकाटे यांच्यावरील चर्चा आणि त्याला उत्तर देतानाची नामुष्की टळली असून हा ही एक सरकारीच डाव तर नाही ना? अशी चर्चा आता विधिमंडळाच्या प्रांगणात रंगली आहे.

विशेष म्हणजे काल अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच विधानसभाध्यक्षांचे आगमन होताच त्यांनी प्रश्नोत्तरांचा तास घेण्याचे निर्देश दिले. मात्र त्याचवेळेस आमदार महेश लांडगे यांनी अबू आझमी प्रकरणावरून टिकेची राळ उठवली. त्यानंतर आ. मुनगंटीवार यांच्यासह उपमु्ख्यमंत्री शिंदे आक्रमक झाले. त्यामुळे दुपारपर्यंत विधानसभेचे कामकाज ४ वेळा तहकूब करावे लागले. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची बातमी आली आणि चर्चेची दिशा पुन्हा फिरली आणि सरकारने सुटकेचा निश्वास टाकला.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री शिंदे
छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आजमी यांचा आम्ही निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच विधानसभा सदस्य अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

दोन्ही सभागृहात निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांच्या शौर्याला मी मानाचा मुजरा करतो. विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यासारखी माणसं शरीराने भारतात राहतात. त्यांना देशाचा इतिहास, संस्कृतीशी कसलेही देणंघेणं नाही. औरंगजेब कसा शासक होता हे जगाला माहीत आहे. अशांची भलामण करणाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो. आपला इतिहास शौर्याचा, पराक्रमाचा आहे. शंभूराजे हे महापराक्रमी तसेच उत्तम प्रशासक होते. औरंगजेबाचा खोटा इतिहास सांगण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास अबू आजमींनी शिकावा, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply