
Cashew nut production : मुंबई, दि. १२ : महाराष्ट्रातील विशेषतः कोकणातील काजू उत्पादन वाढवण्यासाठी आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी सरकार विविध योजना राबवणार आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान मंत्री रावल म्हणाले की, राज्यात काजू उत्पादन वाढवण्यासाठी नव्याने काजू बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. या बोर्डाचे कामकाज सुरू झाले असून, संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. रत्नागिरीतील तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांसोबत अभ्यास दौरा करण्यात आला असून, त्यातून काजू उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली आहे.
भारत हा काजू उत्पादन आणि विक्रीत आघाडीवर आहे, मात्र काजू प्रक्रिया उद्योग वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या सहकार्याने मॅग्नेट योजनेच्या माध्यमातून काजू प्रक्रिया उद्योगाला अधिक प्रोत्साहन दिले जाणार आहे.
गाव पातळीवरील फार्मर प्रोड्यूसर संस्था एकत्र करून राज्यव्यापी संघटना तयार केली जाणार आहे. राज्यात सध्या ४६ स्टेट लेव्हल असोसिएशन कार्यरत असून, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि सुसूत्र होईल, असे मंत्री रावल यांनी सांगितले.
तसेच, राज्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन खरेदी झाली असून, या खरेदीसाठी केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी करण्यात आल्याची माहितीही मंत्री रावल यांनी दिली.
या चर्चेत विधान परिषदेतील विविध सदस्यांनी सहभाग घेतला. राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिक चांगले उत्पन्न मिळावे आणि प्रक्रिया उद्योगाला गती मिळावी यासाठी सरकार पुढील काळात ठोस निर्णय घेणार आहे.