District Bank : नागपूर जिल्हा बँकेला पुनरुज्जीवनाची संजीवनी – शेतकऱ्यांना आर्थिक बळ..


District bank : नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू झाली असून, तिचे संस्थापक प्रशासकत्व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून अधिक आर्थिक बळकटी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

गुढीपाडव्याच्या औचित्याने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात या निर्णयाचा अधिकृत सोहळा पार पडला. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, कृषी व मदत पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार आशिष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, सहकार आयुक्त दीपक तावरे आणि प्रशासक विद्याधर अनास्कर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर जिल्हा सहकारी बँकेच्या सक्षमीकरणासाठी सहकार आयुक्तालय प्रभावी भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी येत्या दीड वर्षांत बँकेला आर्थिक स्थैर्य मिळेल आणि शेतकऱ्यांना लाभदायक सेवा मिळतील, असे सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्हा बँकेच्या पुनरुज्जीवनाला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा भक्कम पाठिंबा मिळाल्याचे सांगितले. यामुळे पुढील दोन वर्षांत ही बँक फायद्यात येईल आणि जिल्ह्यातील शेतकरी व सहकारी संस्थांसाठी एक महत्त्वाचा आर्थिक आधार निर्माण होईल.

आमदार आशिष देशमुख यांनी नागपूर जिल्हा बँकेत मुदत ठेवी जमा करून अधिक लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना केले. प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी शिखर बँक, जिल्हा बँका आणि विविध सहकारी संस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगत, राज्य सहकारी बँकेने ५२ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा पार केला असल्याची माहिती दिली.

या निर्णयामुळे नागपूर जिल्हा सहकारी बँकेला नवी दिशा मिळणार असून, शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर योजना आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील सहकार चळवळीला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply