Agricultural Woman : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला कृषी अभियंता डॉ. स्मिता खोडके आज झाल्या सेवानिवृत्त..

Agricultural Woman

Agricultural Woman : महाराष्ट्रातील कृषी अभियांत्रिकी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आणि राज्याच्या पहिल्या महिला कृषी अभियंता म्हणून मानाचा ठसा उमटवणाऱ्या डॉ. स्मिता खोडके या आज दिनांक ३१ मार्च २५ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या कार्यपूर्तीच्या निमित्ताने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित निरोप समारंभात त्यांचा सन्मान करण्यात आला.

शेती आणि कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य:
डॉ. स्मिता खोडके यांनी कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळताना शेतकरी, लघु उद्योजक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे संशोधन आणि मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात प्रगती साधली.

सेवानिवृत्ती सोहळ्यात मान्यवरांचे गौरवोद्गार:
या विशेष समारंभास विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इन्द्र मणि, माजी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, डॉ. उदय खोडके, तसेच विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख आणि मान्यवर उपस्थित होते. डॉ. इन्द्र मणि यांनी प्राध्यापक कधीही निवृत्त होत नसतात, ते कायम ज्ञानदान करत राहतात, असे सांगून त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली.

कार्यक्रमात त्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या विद्यार्थीप्रिय, मनमिळाऊ, कष्टाळू आणि मार्गदर्शक स्वभावाचे कौतुक केले. आपल्या ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत शेतकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे, असे सांगत डॉ. स्मिता खोडके यांनी आपल्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमास विद्यापीठातील अनेक प्राध्यापक, विद्यार्थी व अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे मार्गदर्शन लाभत राहो, अशा शुभेच्छा सर्वांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply