
Vehicle purchase : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात दुचाकी, चारचाकी आणि अन्य वाहनांच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे. मागील सात दिवसांत नव्या वाहनांच्या नोंदणीत ३० टक्के वाढ झाली असून, २०२४ च्या तुलनेत यावर्षी २०,०५७ अधिक वाहने खरेदी करण्यात आली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये चारचाकी वाहनांची नोंदणी २२,०८१ वर पोहोचली असून, ती मागील वर्षाच्या तुलनेत ४,९४२ ने अधिक आहे. यामुळे या वाहन खरेदीत २८.८४ टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे दुचाकी वाहनांची नोंदणी ५१,७५६ वर पोहोचली असून, मागील वर्षाच्या तुलनेत ११,०८१ वाहनांची वाढ झाली आहे, जी २७.१४ टक्के अधिक आहे.
राज्यात सर्वाधिक वाहन नोंदणी झालेल्या पाच परिवहन कार्यालयांमध्ये पुणे आघाडीवर आहे. पुणे परिवहन कार्यालयात ११,०५६, पिंपरी-चिंचवडमध्ये ६,६४८, नाशिकमध्ये ३,६२६, मुंबई (मध्य) मध्ये ३,१५४ आणि ठाणे कार्यालयात ३,१०७ नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे.
वाहन उद्योगासाठी गुढीपाडवा हा नेहमीच विक्रीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा सण मानला जातो. यंदाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नवीन गाड्यांची खरेदी करत भरघोस प्रतिसाद दिला आहे.