Indian horticulture : भारतीय शेती आणि विशेषतः फलोत्पादन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी भारत आणि इस्रायल यांच्यात नुकताच नवी दिल्लीमध्ये महत्त्वाचा कृषी सहकार्य करार झाला. या करारामुळे आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची बियाणे, जलसंधारण, आणि सुगीनंतरच्या प्रक्रियेतील नवकल्पना भारतीय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. फलोत्पादनातील उत्पादन वाढवणे, कीड नियंत्रण आणि कृषी यांत्रिकीकरण यासाठी इस्रायलच्या सहकार्याचा मोठा उपयोग होणार आहे.
राष्ट्रीय कृषी विज्ञान संकुलात झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आणि इस्रायलचे कृषी व अन्न सुरक्षा मंत्री अवि डिक्टर यांच्यात चर्चा झाली. यावेळी कृषी सहकार्य करार आणि त्याच्या कार्य आराखड्यावर स्वाक्षरी करण्यात आली. विशेष बाब म्हणजे अवि डिक्टर यांचा हा भारतातील पहिलाच अधिकृत दौरा आहे.
या करारामुळे मृदा आणि जल व्यवस्थापन, उत्कृष्ट बियाण्यांची निर्मिती, सुगीच्या काळातील तंत्रज्ञान, पशुपालन, संशोधन आणि प्रशिक्षण यामध्ये दोन्ही देश एकत्र काम करतील. परिणामी, शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढेल. शिवराज सिंह चौहान यांनी या वेळी सांगितले की, इस्रायली विज्ञान आणि भारतीय संशोधन यांचे एकत्रित प्रयत्न भारतीय शेतीला अधिक सक्षम आणि नफा देणारी बनवतील.
इस्रायलचे कृषी मंत्री डिक्टर यांनी हवामान बदलामुळे अन्न सुरक्षेसमोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांवर नवोन्मेषाद्वारे उपाय शोधण्यावर भर दिला. त्यांनी भारताच्या डिजिटल कृषी मोहिमेतील प्रगतीचे कौतुक करत, या उपक्रमात इस्रायलचा सहभाग वाढवण्याचा मनोदय व्यक्त केला.
उत्कृष्टता केंद्रांचा विस्तार, तांत्रिक प्रशिक्षण, बियाणे सुधारणा योजना, फलोत्पादनात बाजारपेठेचा विकास अशा अनेक मुद्द्यांवर सहमती दर्शवून दोन्ही देशांनी कृषी भागीदारी अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. हा करार शेतकऱ्यांना अधिक टिकाऊ, आधुनिक आणि नफ्यावर आधारित शेतीकडे घेऊन जाण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल समजले जात आहे.












