PM Kisan Yojana : शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच २०वा हप्ता तुम्हाला मिळण्याची शक्यता कमी आहे. याचे कारण म्हणजे हा हप्ता मिळवण्यासाठी सरकारने महत्त्वाची अट घातली आहे. ती म्हणजे, सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी ३० एप्रिल २०२५ पर्यंत ‘शेतकरी ओळखपत्र’ म्हणजेच ‘Farmer ID’ साठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. ही नोंदणी पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो.
फार्मर आयडी म्हणजे काय?
शेतकरी ओळखपत्र हे एक डिजिटल आयडी आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याचा नाव, आधार क्रमांक, जमीन तपशील, बँक खाते आणि इतर माहिती एकत्रित केली जाते. यामुळे सरकारी योजनांचा लाभ थेट आणि पारदर्शकपणे पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येतो.
नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे:
– आधार कार्ड
– शेतीच्या जमिनीचे दस्तऐवज (७/१२, फेरफार)
– बँक पासबुक
– मोबाईल क्रमांक
– पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
नोंदणी कशी करावी?:
शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’, ‘सेतू केंद्र’ किंवा ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ (CSC) ला भेट द्यावी. केंद्रात उपस्थित कर्मचारी तुमची माहिती घेऊन ऑनलाइन अर्ज करतील. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला शेतकरी आयडी (farmer id) मिळेल.
नोंदणी का आवश्यक आहे?:
सरकारकडून पीएम किसान, पीएम कृषी विमा, कृषी यांत्रिकीकरण, सौर ऊर्जा योजना, खत अनुदान अशा अनेक योजनांसाठी लाभार्थ्यांची ओळख निश्चित करण्यासाठी शेतकरी आयडी आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यातील सर्व योजनांसाठी ही आयडी प्राथमिक निकष ठरणार आहे.
महत्त्वाचे लक्षात ठेवा:
जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि शेतकरी आयडीसाठी अद्याप नोंदणी केली नसेल, तर ३० एप्रिलपूर्वी तात्काळ नोंदणी करा. अन्यथा, पुढील हप्ता थांबवण्यात येऊ शकतो. नोंदणी मोफत आहे आणि कोणतीही फी आकारली जात नाही.












