UPI payment : शेतकऱ्यांसाठी युपीआय पेमेंटबाबत आनंदाची बातमी; असा झाला बदल..

UPI payment : रिझर्व्ह बँकेने (RBI) युपीआय (UPI) पेमेंटची मर्यादा वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला असून, याचा थेट फायदा शेतकऱ्यांसह सामान्यांना होणार आहे. आता शेतकरी युपीआयच्या माध्यमातून एका व्यवहारात ५ लाख रुपयांपर्यंत पैसे भरू शकणार आहेत. यापूर्वी ही मर्यादा १ लाख रुपयांपर्यंत होती.

शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी फी भरताना किंवा कुटुंबातील आरोग्य सेवांसाठी हॉस्पिटलमध्ये शुल्क भरताना मोठी रक्कम द्यावी लागते. आता या व्यवहारांसाठी बँकेत जायची गरज नाही, कारण हे सर्व काम मोबाईलमधून युपीआयच्या माध्यमातून सहज करता येणार आहे.

याशिवाय, विमा हप्ते, क्रेडिट कार्डचे बिल आणि म्युच्युअल फंड यांसारख्या मासिक किंवा नियमानुसार होणाऱ्या रकमेच्या व्यवहारांमध्येही आता १ लाखापर्यंतची रक्कम थेट विना त्रास भरता येणार आहे. यापूर्वी अशा व्यवहारांसाठी १५,००० रुपयाचीच मर्यादा होती.

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिक यांना मोठा दिलासा मिळणार आहे. डिजिटल व्यवहार अधिक सोपे, जलद आणि सुरक्षित होतील. शेतकऱ्यांना वेळ वाचेल, पैसे लगेच पोहोचतील आणि बँकेच्या फेऱ्या कमी लागतील.

आरबीआयच्या या पावलामुळे देशात डिजिटल व्यवहारांची वाढ होणार असून, शेतकऱ्यांसाठी आर्थिक व्यवहार अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहेत.