rain update : राज्यात पुढील दोन दिवस म्हणजे १४ आणि १५ एप्रिल दरम्यान कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह गडगडाटी पावसाचेही संकेत दिले गेले आहेत.
दरम्यान १६ एप्रिलपासून मात्र राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. १६ ते १९ एप्रिलदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्वच विभागांमध्ये पावसाची शक्यता नसून आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे.
दरम्यान, मागील २४ तासांत राज्यात कोणत्याही भागात पावसाची नोंद झाली नाही. बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान कायम राहिले. तापमानाच्या दृष्टीने पाहता चंद्रपूर येथे सर्वाधिक ४२.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. नागपूर ४१.१, वाशिम ४१.०, लोहगाव ४०.९, मालेगाव ४०.६, अकोला आणि सोलापूर प्रत्येकी ४०.२ अंश या उष्ण तापमानांनी विदर्भ आणि मराठवाडा भागात उन्हाची तीव्रता जाणवली.
पुणे आणि सातारा येथे अनुक्रमे ३७.७ आणि ३७.२ अंश तापमान नोंदवले गेले. मुंबई कुलाबा ३३.८, सांताक्रूझ ३३.५, कोल्हापूर ३५.८, रत्नागिरी ३३.०, महाबळेश्वर ३०.३ अंश तापमानासह कोकणात तुलनात्मक सौम्य तापमान राहिले. हवामान विभागाने उष्णतेपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, जास्त वेळ उन्हात न थांबता थंड हवामानात राहण्याचा सल्ला दिला आहे.












