Junnar agricultural irrigation : कुकडी प्रकल्पाच्या वडज उपसा सिंचन योजनेला आता प्रत्यक्ष कामाची गती मिळणार आहे. ही योजना अनेक वर्षांपासून रखडली होती, मात्र आता ३० जूनपर्यंत कामासाठी निविदा निघणार असल्याने जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तशा सूचनाच जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या आहेत.
या योजनेमुळे जुन्नर तालुक्यातील पाण्याची टंचाई असलेल्या भागांना सिंचनासाठी स्थिर व नियमित पाणीपुरवठा होणार आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत कालवा पोहोचत नाही, अशा ठिकाणी वडज उपसा योजनेमुळे थेट पाण्याचा लाभ मिळणार आहे. यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामातही शेतीला पाणी मिळून पीक उत्पादनात वाढ होईल.
मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत कुकडी प्रकल्पाशी संबंधित विविध कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये वडज उपसा योजनेसह पिंपळगाव जोगे धरणातील कालव्यांचे अस्तरीकरण, गळती रोखण्याचे उपाय, माणिकडोह जलाशयातील बुडीत बंधाऱ्याचे काम आणि मीना कालव्याच्या दुरुस्तीसंबंधी चर्चा झाली.
पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या भागात ही योजना म्हणजे वरदान ठरणार आहे. या योजनेद्वारे नदीपात्रातून उंच भागाकडे पाणी उचलून कालव्यांद्वारे शेतीपर्यंत नेण्यात येते. त्यामुळे डोंगर उतारावरील शेतकरी, जिथे नैसर्गिक प्रवाह पोहोचत नाही, अशा ठिकाणी देखील पाण्याचा लाभ मिळू शकतो.
धरणांमधील साचलेल्या गाळामुळे पाणीसाठवण क्षमताही कमी झाली आहे. त्यामुळे गाळ काढण्याच्या कामालाही वेग देण्याचे ठरवण्यात आले आहे. या सर्व उपाययोजनांमुळे जुन्नर तालुक्यातील शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याची टंचाई काही अंशी भरून निघण्याची शक्यता आहे.
ही योजना वेळेत पूर्ण झाली, तर परिसरातील हजारो शेतकऱ्यांना पाण्याचा आधार मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच मदत होईल.












