Summer peanuts : उन्हाळी भुईमुगासाठी ‘हे’ तंत्र वापरा; पाणी लागेल कमी आणि उत्पादन वाढण्याची हमी..

Summer peanuts : उन्हाळी भुईमुग पिकाच्या योग्य वाढीसाठी व उत्पादनवाढीसाठी तुषार सिंचन ही आधुनिक आणि परिणामकारक सिंचन पद्धत ठरत आहे. ग्रामीण कृषि मौसम सेवा, इगतपुरी यांनी दिलेल्या हवामानाधारित सल्ल्यानुसार, उन्हाळी भुईमुग पिकाच्या शेवटच्या टप्प्यात, म्हणजे आऱ्या (गाठी) लागणे व शेंगा भरण्याच्या अवस्थेत, तुषार सिंचन केल्यास पिकाची वाढ उत्तम होते, पाण्याची बचत होते आणि उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

तुषार सिंचनामध्ये जमिनीत वाफसा टिकून राहतो, हवा आणि पाण्याचे संतुलन राखले जाते, आणि पीकाभोवती सूक्ष्म वातावरण तयार होते. त्यामुळे जमिन भुसभुशीत राहते, आऱ्या लागण्याचे प्रमाण वाढते आणि पिकाची वाढ अधिक निरोगी होते. या पद्धतीमुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, ज्यामुळे पानांची स्थिती सुधारते आणि चाराही चांगल्या प्रतीचा मिळतो.

या पद्धतीत दोन तुषार यंत्रांमध्ये साधारण १२ बाय १२ मीटर अंतर ठेवावे लागते. पाणी फवारणीचा वेग साधारण ताशी १.५ ते २ सेंटीमीटर इतका असतो. त्यामुळे जमिनीत ५ सें.मी. खोलीपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी यंत्र २ ते ३ तास चालवावे लागते. पाण्याचा दाब २ ते ३.५ किलो / चौ.मी. इतका असतो. तुषार सिंचनाची कार्यक्षमता सुमारे ८०–८२ टक्के असून ३०–३५ टक्के पाणी बचतीसह उत्पादनात १५–२० टक्क्यांनी वाढ होते.

विशेष म्हणजे, जिथे प्लास्टिक आच्छादन केलेली भुईमुग लागवड आहे, अथवा गाळयुक्त जमिनीत पीक घेतले जाते, तिथे तुषार सिंचन अधिक फायदेशीर ठरते. यामुळे सिंचन व्यवस्थापन अधिक अचूक होते आणि जमिनीतील आर्द्रतेचा समतोल राखता येतो.

शेतकऱ्यांनी तुषार सिंचन ही पद्धत अवलंबल्यास सिंचनात सातत्य राहते, पाण्याचा अपव्यय टाळता येतो आणि उत्पादन खर्च कमी होतो. परिणामी, उन्हाळी भुईमुगाच्या उत्पन्नात हमखास वाढ होते, आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही सकारात्मक बदल होतो. त्यामुळे ही सिंचन पद्धत शाश्वत शेतीसाठी योग्य दिशा ठरते.