farmers Special facility : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पुणे रेल्वे स्थानकावर वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक खास ‘विश्रांती मंडप’ उभारला आहे. हा मंडप फलाट क्रमांक १ जवळच्या व्हीआयपी साइडिंग भागात तयार करण्यात आला असून, प्रवाशांना थांबण्यासाठी ही सुरक्षित आणि आरामदायक जागा उपलब्ध झाली आहे.
या उपक्रमामागचा उद्देश असा आहे की, फलाटावर अनावश्यक गर्दी टाळावी आणि सर्वसामान्यांना आरामात बसून आपल्या गाडीची वाट पाहता यावी. विश्रांती मंडपात पुरेशी लाईट, पंखे, महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र पोर्टेबल शौचालये, डिजिटल माहितीफलक आणि मदत केंद्र अशी सर्व मूलभूत व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रवाशांची सुरक्षितता आणि गर्दी नियंत्रणासाठी २५ रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) कर्मचारी आणि १५ तिकिट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत एक वाणिज्य निरीक्षक आणि एक अधिकारी देखील मंडपात सतत लक्ष ठेवत आहेत. खास बाब म्हणजे, सर्वसामान्य डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकिट तपासणी विश्रांती मंडपातच केली जात आहे आणि तिकीट वैध असल्यासच फलाटावर प्रवेश दिला जात आहे.
या व्यवस्थेमुळे प्रवाशांची चेंगराचेंगरी टाळली जात असून, महिला, वृद्ध, लहान मुलांसह सर्वांसाठी अधिक सुटसुटीत आणि सुरक्षित प्रवास अनुभव निर्माण होत आहे. पुणे रेल्वे विभागाकडून ही सुविधा केवळ गर्दी नियंत्रणासाठी नाही, तर सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी एक सकारात्मक पाऊल आहे.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या शेतकरी, कामगार आणि इतर सर्वसामान्य नागरिकांसाठी ही विश्रांती मंडप व्यवस्था एक मोठा दिलासा ठरत असून, पुण्यातून रेल्वेने निघताना आता वाट पाहणं थोडं अधिक सुसह्य होणार आहे.












