Grape damage : द्राक्ष बागेची योग्य वाढ, एकसंध फुटी आणि पुढील उत्पादन चांगले यावे यासाठी खरड छाटणी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. या छाटणीची योग्य पद्धत वापरली नाही, तर पुढे उत्पादनावर परिणाम होतो आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं, असा सल्ला इगतपुरी येथील महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी हवामान विभागाने दिला आहे.
खरड छाटणी म्हणजे मागील हंगामात तयार झालेल्या ओलांड्यावर आलेली काडी तळापासून छाटणे. ही छाटणी करताना त्या काडीवर केवळ एकच डोळा ठेवावा. अनेकदा शेतकरी अधिक डोळे ठेवतात, त्यामुळे फुटी मागेपुढे निघतात आणि संपूर्ण बागेत एकसंध वाढ होत नाही. परिणामी फुलधारणा आणि उत्पादनात विस्कळीतपणा येतो.
ज्या बागांमध्ये ओलांडा नीट वाढलेला नाही किंवा मागील हंगामातील काडी वापरायची आहे, तिथे पाच ते सहा डोळे ठेवून छाटणी करता येते. मात्र, जुन्या ओलांड्यावर नवीन फुटी तयार करत असताना ही छाटणी अधिक काळजीपूर्वक करावी लागते.
फुटी एकाच वेळी, समप्रमाणात यावी यासाठी हायड्रोजन सायनामाईड या रसायनाचा वापर केला जातो. हे रसायन जुन्या ओलांड्यावरच लावावे. नवीन फुटलेल्या किंवा तयार होत असलेल्या ओलांड्यावर लावल्यास नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे रसायन वापरताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
खरड छाटणी ही केवळ एक तांत्रिक प्रक्रिया नसून, ती उत्पादनाच्या दर्जावर आणि निर्यातक्षम द्राक्ष मिळवण्यावर थेट परिणाम करणारी बाब आहे. छाटणी योग्य न झाल्यास पुढे कीड, रोग आणि एकसंध फुलधारणा न होण्याचे धोके वाढतात.
त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी हवामान आणि बागेची अवस्था पाहून कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नेमकी खरड छाटणी करावी, असे आवाहन इगतपुरी येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राने केले आहे. हे पाऊल पुढील उत्पादन यशस्वी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.












