hybrid-cows & goats : उन्हाळ्यात उष्णतेचा जास्त त्रास गाई-म्हैस, शेळी आणि इतर जनावरांना होतो. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडू शकते, दूध कमी होऊ शकते, आणि प्रजनन क्षमताही कमी होते. हे टाळण्यासाठी शेतकरी आणि पशुपालकांनी उन्हाळ्यात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कृषी आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.
गाई आणि म्हशींची काळजी कशी घ्यावी?:
संकरीत गाई आणि जास्त दूध देणाऱ्या म्हशींसाठी उन्हाळ्यात विशेष काळजी गरजेची आहे.
– जनावरांना झाडाखाली किंवा गोठ्यात थंड जागी बांधावे.
– गोठ्याच्या छपरावर गवत, पाला-पाचोळा टाकून पाणी शिंपडल्यास गोठा थंड राहतो.
– दिवसभरात ३ ते ४ वेळा थंड पाणी द्यावे.
– आहारात क्षार मिश्रण वाढवावे.
– दुपारी उन्हाच्या वेळेत जनावरांना चरण्यासाठी नेऊ नये.
– गोठ्यात अधूनमधून पाणी फवारावे.
– रात्री आणि पहाटे वाळलेली वैरण भरपूर द्यावी.
– दुपारी हिरवी मका, चवळी, कडवळ, लसूण घास अशी पोषणमूल्य असलेली वैरण द्यावी.
यामुळे दूध उत्पादन टिकते आणि प्रजनन सुधारते. चाऱ्याची कमतरता असल्यास गव्हाच्या काडावर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार युरियाची प्रक्रिया करून ती जनावरांना खाऊ घालावी.
शेळ्यांची काळजी कशी घ्यावी?:
– प्रत्येक मोठ्या शेळीला दिवसाला ३ ते ५ किलो हिरवा चारा मिळेल यासाठी आधीच तयारी करावी.
– यासोबत २०० ते ३०० ग्रॅम चांगल्या दर्जाचं पशुखाद्य द्यावं.
– हिरवा चारा कमी असेल, तर हिरवा आणि सुका चारा मिसळून ओलं खाद्य तयार करावं.
– चारा आणि पशुखाद्याचं प्रमाण ५०:५० असावं.
– चाऱ्यात क्षार मिश्रण, जीवसत्त्वं आणि प्रोबायोटिक्स वापरल्यास मांसवाढ सुधारते.
– बंदिस्त शेळीपालनात चारा ३ ते ४ वेळा विभागून सकाळी आणि सायंकाळी द्यावा.
– एप्रिलमध्ये शेळ्यांना बुळकांडी रोगाची लस टोचून घ्यावी.
उन्हाळ्यात जनावरांची योग्य काळजी घेतल्यास त्यांची तब्येत चांगली राहते, दूध उत्पादन टिकते आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढतं. थोडक्यात, कमी खर्चात जास्त फायदा मिळवता येतो. शेतकऱ्यांनी या उपायांचा वापर करून आपल्या पशुधनाचं संरक्षण करावं आणि शेतीपूरक व्यवसायात सातत्य ठेवावं.












