Evaporation : वाढत्या तापमानामुळे आणि बाष्पोत्सर्जनाच्या वेगाने शेतातील पीक, फळबागा, भाजीपाला आणि फुलपिकांना अतिरिक्त पाण्याची गरज भासत आहे. याच पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने शेतकऱ्यांसाठी हवामानाधारित कृषि सल्ला जारी केला आहे.
पीक व्यवस्थापन:
काढणी झालेल्या हळद पिकाचे उकडणे, वाळवणे आणि पॉलीश करून साठवणूक गोदामात करावी. उन्हाळी भुईमूग पिकात तुषार सिंचन प्रणालीने आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. भुईमूगाच्या आऱ्या सुटल्यावर मशागत टाळावी. रसशोषक कीड नियंत्रणासाठी एकरी 10–12 पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. पानं खाणाऱ्या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. प्रादुर्भाव आढळल्यास 5% निंबोळी अर्क किंवा 3 मि. ॲझाडिरेक्टिन (30 PPM) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फळबाग व्यवस्थापन:
केळीच्या झाडांना आधार देऊन काढणीस तयार घड लवकरात लवकर तोडावेत. सरीवरंबा पद्धतीने पाणी द्यावे व आच्छादन करून जमिनीतील ओलावा टिकवावा. नव्याने लावलेल्या रोपांना सावली द्यावी. आंबा बागेत पाण्याचा ताण टाळण्यासाठी वेळेवर पाणी द्यावे. फळगळ रोखण्यासाठी आंबा झाडांच्याही आळ्यात आच्छादन आवश्यक आहे. आंब्याची काढणी पूर्ण करावी. द्राक्ष बागेतील काढणी करावी आणि खत व्यवस्थापनासह एप्रिल छाटणी १५ एप्रिल ते १५ मे दरम्यान करावी.
महत्त्वाचा सल्ला:
शेतकऱ्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी थेट सूर्यप्रकाश टाळून सिंचन करावे. अशा प्रकारे तापमान आणि बाष्पोत्सर्जनाचा प्रभाव कमी करून उत्पादनात घट होण्यापासून बचाव करता येईल.












