मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात पावसाचे आगमन होण्याची शक्यता असून, यंदा मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव अधिक जाणवण्याची चिन्हे आहेत. निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मेपासून ३१ मे या दहा दिवसांच्या कालावधीत मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. या पावसात वीजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग आणि ढगांचा मोठा सहभाग असू शकतो.
कोकणासोबतच मध्य महाराष्ट्रातील १० आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत २५ मेपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील ११ जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी आणि नांदेड या १७ जिल्ह्यांमध्ये वळवाच्या पावसाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता आहे.
या पावसामागे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि दक्षिण चीन समुद्र या तीन समुद्रांत एकाचवेळी तयार होत असलेली कमी दाबाची पट्टी आणि त्यातून निर्माण होणारे चक्रीय वारे हे मुख्य कारण आहे. हे वारे उत्तरेकडे सरकणार असून त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा आणि बंगालमध्ये पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.
हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांनी या पावसाचा उपयोग केवळ मशागतीसाठी करावा. कपाशी आणि टोमॅटो यांसारख्या पिकांची लागवड करताना पाण्याची व्यवस्था असल्यासच पुढे जावे, अन्यथा अशा पावसामुळे लागवडीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. पेरण्या सुरू करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान व सुविधा पाहून घ्यावा.
या पावसामुळे सध्या महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमानात घट झाली असून वातावरण तुलनेत आल्हाददायक बनले आहे. मात्र खरा मान्सून अजून दूर असून त्याचा प्रवेश महाराष्ट्रात होण्यासाठी सुमारे २५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये हवामानात आणखी काही बदल झाल्यास त्यानुसार नवे अंदाज वर्तवले जातील, असेही खुळे यांनी सांगितले.












