Clean Plant Program : रोप संशोधनासाठी पुण्यात ‘क्लिन प्लांट प्रोग्रॅम’साठी प्रयोगशाळा स्थापन होणार…

Clean Plant Program

Clean Plant Program : शुद्ध आणि रोगमुक्त रोपवाटिका तयार करण्यासाठी पुण्यात ‘क्लिन प्लांट प्रोग्रॅम’ अंतर्गत रोपट्यांच्या मूळ प्रतीच्या संशोधनासाठी एक स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली.

नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ अंतर्गत झालेल्या कृषी संवाद कार्यक्रमात चौहान यांनी विदर्भातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषी मंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक डॉ. एम. एल. जाट प्रमुख उपस्थित होते.

केंद्रीय कृषी मंत्री चौहान म्हणाले की, देशभरात आयसीएआरच्या ११३ संस्था आहेत, त्यापैकी ११ संस्था महाराष्ट्रात कार्यरत आहेत. नागपूर येथील मृदा सर्वेक्षण संस्था (NBSSLUP) येथे या संस्थांच्या प्रमुखांची बैठक घेऊन राज्यातील कृषी विकासाची दिशा ठरवली जाणार आहे. प्रयोगशाळा आणि जमिनीतील दरी कमी करून शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.

या अभियानांतर्गत २९ मे ते १२ जूनदरम्यान खरीप हंगामासाठी कृषी वैज्ञानिक गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना शाश्वत शेती, उच्च दर्जाचे बियाणे, माती परीक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. कृषी वैज्ञानिक आणि विस्तार अधिकारी एकत्रितपणे काम करून शेतकऱ्यांना नवोपक्रमांची माहिती देतील, असे चौहान यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात ‘नॅशनल सॉईल स्पेक्ट्रल लायब्ररी’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री चौहान यांच्या हस्ते झाले. NBSSLUP संस्थेने हायपर स्पेक्ट्रल सेन्सर आणि स्पेक्ट्रोरेडिओमीटरचा वापर करून देशातील मातीची पीएच, घनता आणि मूलद्रव्यांच्या तपशीलांची नोंद केलेली आहे. या लायब्ररीमुळे महाराष्ट्र मृदा नकाशा सादर करणारे पहिले राज्य ठरले आहे.

कापसाच्या पिकांवर होणाऱ्या गुलाबी बोंडअळीच्या प्रभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी AI आधारित ‘स्मार्ट ट्रॅप’ तंत्रज्ञानाचा प्रारंभही याप्रसंगी करण्यात आला. हे यंत्र संक्रमित पिकांबाबत शेतकऱ्यांना अलर्ट देईल, अशी माहिती चौहान यांनी दिली.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैनगंगा-नळगंगा सिंचन प्रकल्पाची माहिती दिली आणि सांगितले की, या प्रकल्पामुळे विदर्भातील सिंचन क्षमता लक्षणीय वाढणार आहे. केंद्र सरकारच्या धोरणांना राज्य सरकारचे पूर्ण सहकार्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कृषी मंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी सध्या मजूर टंचाईमुळे कापूस वेचणीसाठी बॅटरीवर चालणाऱ्या छोट्या ट्रॅक्टरसारख्या यंत्राचा विकास सुरू असून ते यशस्वी ठरल्यास कृषी मंत्रालयाकडे सादर करण्यात येईल, अशी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नागपूर विभागातील शेतकरी व कृषी अधिकारी मोठ्या संख्येने या संवादात सहभागी झाले.