Crop care : ढगाळ हवामानात द्राक्ष आणि डाळिंबाची अशी घ्या काळजी..

Crop care : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याने दिलेला सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या ढगाळ हवामानामुळे तापमानात घट होऊन हवामानातील आर्द्रता वाढते आहे. यामुळे द्राक्ष बागांमध्ये बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः ॲन्थ्रॅक्नोज (करपा) आणि बॅक्टेरियल ब्लाईट या रोगांचा धोका जास्त आहे.

बुरशीजन्य करपा टाळण्यासाठी बागेत अनावश्यक कोवळ्या फुटी वेळेवर काढून टाकाव्यात, जेणेकरून रोग नियंत्रण सोपे होईल. फवारणीसाठी थायोफेनेट मिथाईल (७०% WP) १ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड (५०% WP) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे. तसेच कासुगामायसीन (५%) व कॉपर ऑक्सीक्लोराईड (४५% WP) यांचे संयुक्‍त बुरशीनाशक ३०० ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ट्रायकोडर्मा २ ते ५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात दर १५ दिवसांनी फवारावे. शिवाय, ड्रिप सिंचनाद्वारे २.५ ते ३ लिटर ट्रायकोडर्मा प्रति एकर देणे फायदेशीर ठरते.

जीवाणूजन्य करपासाठी मॅन्कोझेब (७५% WP) २ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा कासुगामायसीन व कॉपर ऑक्सीक्लोराईड संयुक्‍त फॉर्म्युलेशन ३०० ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी. मात्र, या रोगावर स्ट्रेपटोमायसीन वापरणे टाळावे, कारण त्याचा प्रतिकारशक्तीवर विपरित परिणाम होतो. या उपाययोजनांमुळे द्राक्षबागेतील रोगांचे नियंत्रण शक्य होईल व उत्पादनात घट येणार नाही, याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यावी.

डाळिंब बागांमध्ये रोगट फळांचे व्यवस्थापन आवश्यक:

डाळिंब बागांमध्ये काढणीसाठी फळे तयार झाली असतील, तर न कुजलेली व तयार फळे वेळीच तोडून बाजारात पाठवावीत. हवामानातील आद्रतेमुळे डाळिंबाचे फळ सहज कुजण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अशी कुजलेली, डाग पडलेली व कीडग्रस्त फळे बागेतच न ठेवता वेचून लगेचच कंपोस्ट खड्ड्यात टाकावीत.

या फळांचे वेगळे संकलन केल्यास डाळिंब बागांमध्ये पसरणारे रोग आणि किडींचे प्रमाण कमी करता येईल. शिवाय निर्यातयोग्य आणि स्थानिक बाजारात विक्रीसाठी पात्र दर्जाचे फळ राखले जातील.

फळांची वेळेवर काढणी व साफसफाई ही केवळ उत्पादनाचे प्रमाणच नव्हे तर गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठीही अत्यावश्यक आहे. त्यामुळे या हवामानात फळे कुजण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी सगळे कामे स्वच्छ हवामानात पूर्ण करून उत्पादनाचे नुकसान टाळावे.