
Heavy rain alert : भारतीय हवामान विभागाने २६ जुलैपासून महाराष्ट्राच्या विविध भागांसाठी पावसाचे यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट जाहीर केले आहेत. विशेषतः विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा या भागांमध्ये २६ व २७ जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
*२६ जुलै रोजी महाराष्ट्रात पावसाचा विभागानुसार अंदाज:* विदर्भ: बहुतांश भागांत पावसाचा ‘यलो अलर्ट’. काही ठिकाणी वीजांसह जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव राहील.
*मध्य महाराष्ट्र: पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी आहे.
*मराठवाडा: बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि औरंगाबाद परिसरातही यलो अलर्ट दिला असून वीजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडू शकतात.
*कोकण व गोवा:विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’. काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.
*मागील २४ तासांत देशातील पावसाची स्थिती:*
२५ जुलै रोजी देशभरात ११.६ मिमी पावसाची नोंद झाली असून ही दीर्घकालीन सरासरीपेक्षा १५ टक्क्यांनी जास्त आहे. झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, ओडिशा आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये चांगला पाऊस पडला. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि दक्षिण भारतातील काही भागांतही मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडल्या.
*२६ जुलै ते १ ऑगस्ट या सात दिवसांत महाराष्ट्रात कसा राहील पावसाचा अंदाज:*
* कोकणात सलग ५–६ दिवस पाऊस सुरू राहील. २७ व २८ जुलै रोजी जोरदार सरींचा अंदाज आहे.
*मध्य महाराष्ट्रात २६ ते ३० जुलै दरम्यान ५–२५ मिमी दरम्यान पावसाचा अंदाज असून, काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडू शकतात.
*मराठवाड्यात सुरुवातीस हलका पाऊस, पण २८ ते ३० जुलै दरम्यान काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
*विदर्भात सुरुवातीलाच वीजांसह पावसाचा जोर राहील, त्यानंतर आठवड्याच्या उत्तरार्धात कोरडे वातावरण असण्याची शक्यता.
सावधगिरीचा सल्ला:
शेतकऱ्यांनी मुसळधार पावसाचा इशारा असलेल्या भागांमध्ये पीकक्षेत्रातून पाण्याचा निचरा योग्य रीतीने होईल याची खात्री करावी. फवारण्या व खत व्यवस्थापन उघड्या हवामानात कराव्यात. कोरड्या भागांत पाणी साठवणीच्या उपाययोजना तातडीने कराव्यात. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वैज्ञानिक सल्ल्यानुसार शेतीचे नियोजन करणे अत्यावश्यक ठरत आहे.