Onion rate : होळी-धुळवड सणांच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांमध्ये मजूर टंचाई निर्माण झाल्याने लिलाव प्रक्रियेला तात्पुरता खंड पडणार आहे. रविवारची नियमित सुटी आणि त्यानंतरचे सण यामुळे २ ते ४ मार्चदरम्यान व्यापारी वर्ग लिलावात सहभागी होणार नसून पुढील लिलाव थेट ५ मार्च रोजी होणार आहे. सलग चार ते पाच दिवस व्यवहार बंद राहिल्याने त्या दिवशी कांद्यासह इतर शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लासलगाव बाजार समिती येथे १,६४० वाहनांतून आलेल्या लाल कांद्याचा लिलाव ३०० ते १,२०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान झाला असून सरासरी भाव ८०० रुपये नोंदवला गेला. व्यापारी संचालक प्रवीण कदम आणि बाळासाहेब दराडे यांनी दिलेल्या पत्रात होळी व धुळवडमुळे कांदा ग्रेडिंग आणि पॅकिंगसाठी आवश्यक मजूर उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे, ज्याचा थेट परिणाम बाजारातील व्यवहारांवर होणार आहे.
रेल्वे रॅक पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने खरेदी केलेला कांदा बाहेरच्या बाजारपेठेत पाठवणे सध्या अडचणीचे ठरत आहे. परिणामी व्यापारी वर्ग सोमवार (दि. २) ते बुधवार (दि. ४) या कालावधीत लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खरीप (लाल) कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असतानाच रॅक अपुरे मिळणे, तसेच चालक आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे काही वेळा रॅक दोन-तीन दिवस एकाच ठिकाणी उभे राहतात. यामुळे व्यापाऱ्यांच्या खळ्यात माल साचून राहण्याची परिस्थिती निर्माण झाली असून बाजारातील व्यवहार आणि पुरवठा साखळीवर त्याचा थेट परिणाम होत आहे.
नाशिकसह अनेक बाजार समित्या बंद
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांमधील लिलाव प्रक्रिया तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. सणानिमित्त अनेक मजूर बाहेरगावी गेल्यामुळे नियमित कामकाजावर परिणाम झाला असून लिलाव सुरळीत पार पाडणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजार समिती प्रशासनानेही शेतकऱ्यांना याबाबत पूर्वसूचना देत लिलाव बंद राहणार असल्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने नाशिकसह राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये व्यवहार थांबणार असून पुढील तारखांना लिलाव पुन्हा सुरू होणार आहेत.












