सावकाराने तुमची जमीन बळकावलीय आहे का ? तर जिल्हा उपनिबंधकांकडे 15 वर्षांपर्यंत दाखल करता येतो दावा;जाणून घ्या सविस्तर ..

जिल्ह्यामध्ये १ हजार १६६ परवानाधारक खासगी सावकार आहेत. खासगी सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.जिल्हा उपनिबंधकांकडे खासगी सावकाराने जमिनी बळकावल्याच्या एप्रिल २०२३ ते ११ मार्च २०२४ या कालावधी मध्ये १०५ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. सोलापूर जिल्हा उपनिबंधकांकडे सध्या १६१ तक्रारींची सुनावणी सुरु आहे कार्यालयामध्ये वकिलांसह तक्रारदारांची मोठी गर्दी आहे.

बॅंकेचे पूर्वीचेच कर्ज थकलेले आहे,दुष्काळामुळे शेतात पीक नाही, अशा परिस्तिथीत बॅंकेकडून परत नवीन कर्ज मिळत नाही. अशावेळी अडचणीतील शेतकरी खासगी सावकाराकडून कर्ज घेतात ,कायद्यानुसार निश्चित केलेल्या व्याजदरापेक्षा जास्त दराने अनेक सावकार कर्ज देतात. पण, त्यावेळी रेकॉर्डवरील व्याजदर आणि लोकांसमोर सावकाराच्या मर्जीतील ठरलेला व्याजदर वेगळाच असतो.

चिंता करण्यासाठीची एक बाब म्हणजे अडीच-तीन लाखांहून जास्त रक्कम घ्यायची जर असल्यास सावकार मोक्याची जागा किंवा समोरच्याची एक एकर जमीन किंवा गहाणखत किंवा खरेदीखत करून स्वत:च्या किंवा नातेवाईकाच्या नावा वर करतो. त्यानंतर मुद्दलावरील व्याज एका वर्षानंतर देणे बंधनकारक केले जाते आणि शेतकऱ्यांनी व्याज दिले नाही तर तीच रक्कम पुन्हा मुद्दल मध्ये गृहीत धरले जाते व त्याला व्याज लावले जाते. शेतकरी हा खासगी सावकाराच्या जास्त व्याज दरामुळे कर्ज फेडू शकत नाही आणि कर्जाचे पैसे परत न केल्यामुळे सावकार ती जमीन शेतकऱ्याला परत देत नाही, अशी सावकारांची सावकारकी सुरु आहे. परंतु आता , जिल्हा उपनिबंधकाकडे महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ नुसार खरेदीखत रद्द करण्याचा अधिकार दिला आहे.

फसवणूक झालेले शेतकरी दावा दाखल करू शकतात…

खासगी सावकाराने जर फसवणूक करून कोणत्या शेतकऱ्याची जमीन, जागा बळकावली असेल तर त्या शेतकऱ्याने साध्या कागदावर जरी आमच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयास तक्रार दिली, तरी त्याची शहानिशा केली जाईल . तक्रारदार शेतकऱ्याने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ नुसार दावा दाखल करावा, दावा दाखल केल्यानंतर सुनावणी घेऊन पुरावे पडताळून पहिले जातात व सावकाराकडून त्या व्यक्तीला त्याची जमीन परत करण्यात येते.

– किरण गायकवाड, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर

जिल्ह्यातील या वर्षीची सावकाराची स्थिती

परवानाधारक सावकार

१,१६६

कर्जदार व्यक्ती

१,६५,२६४

सावकारांकडून कर्जवाटप

४६.५८ कोटी

सावकारांविरुद्धच्या तक्रारी

१०५

तुमची जमीन सावकाराने बळकावलीय का?

अन्यायग्रस्त शेतकरी थेट जिल्हा उपनिबंधकांकडे महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४मधील कलम १८, नियम १७ नुसार दावा दाखल करू शकतात . याबाबत पोलिस केस व्हायलाच पाहिजे असे काहीही बंधन नाही . मात्र , फसवणूक झाल्यापासून तक्रारदाराला १५ वर्षांपर्यंतच दावा दाखल करता येतो त्यामुळे जर खासगी सावकाराने कोणाची फसवणूक केली असेल तर त्या व्यक्तीने मुदतीमध्ये दावा दाखल करणे गरजेचे आहे. आतापर्यंत एक हजार ३७५ शेतकऱ्यांनी जमिनी बळकावल्याच्या जिल्हा उपनिबंधकांकडे जिल्ह्यातील तक्रारी केल्या आहेत . त्यामधील ११५ प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आले आहे. आता सध्या १६१ तक्रारींवर सुनावणी सुरू आहे.

Leave a Reply