
Harbhara Bajarbhav : मागील काही दिवसांपासून हरभऱ्याची आवक कमी असून अनेक बाजारांत हरभऱ्याचे बाजारभाव हे हमीभावापेक्षा जास्त आहेत. यंदाच्या रब्बी हंगामासाठी म्हणजेच २०२४-२५ साठी हरभऱ्याचे हमीभाव हे ५४४० रुपये प्रति क्विंटल असे आहे. मागच्या वर्षीच्या तुलने त्यात १०५ रुपयांनी वाढ झाली आहे.
दरम्यान मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक बाजारात हरभरा ६ हजारापेक्षाही जास्त भाव खाताना दिसत आहे. दिनांक २४ डिसेंबर रोजी शहादा बाजारात हरभऱ्याचा सरासरी १० हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता. पुणे बाजारात हरभऱ्याला सरासरी ८ हजार ५० रुपये बाजारभाव मिळाला. हिंगोलीत हरभरा हमीभावापेक्षा थोडा जास्त म्हणजे ६ हजार ३७ रुपये प्रति क्विंटल असा विकला जात होता.
दरम्यान नाताळच्या दिवशी पुणे बाजारात हरभऱ्याचा बाजारभाव सरासरी ७९५० रुपये प्रति क्विंटल , तर कमीत कमी ७३०० रुपये प्रति क्विंटल असा होता. म्हणजेच हमीभावापेक्षा सुमारे २० टक्क्यांनी जास्त होता. तर अकोला बाजारात काबुली हरभऱ्याला सर्वोच्च म्हणजेच प्रति क्विंटल १२ हजार ५०० रुपयांचा बाजारभाव मिळाला. तीन दिवसांपूर्वी म्हणजेच २३ डिसेंबर रोजी लासलगाव बाजारात काबुली हरभऱ्याला सरासरी ११ हजार ५०० रुपयांचा बाजारभाव मिळाला होता.